सोलापूर (Solapur) : सोलापूर महापालिकेतील अनेक फाइल गायब झाल्या आहेत. हे प्रकरण आयुक्तांनी गांभीर्याने घेतले असून, मुख्य लेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्यासह तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेच्या बांधकाम, रस्ते, गवसू, भूमीमालमत्ता, मशिनरी अशा विविध विभागांचे लेखापरीक्षण (ऑडिट ) करण्यासाठी शासकीय लेखापरीक्षक आले असता, या विभागांच्या सुमारे ११० फायलींपैकी केवळ बोटावर मोजता येतील इतक्याच फाइल तपासणी करण्यासाठी मिळाल्या. अन्य फायलींचा थांगपत्ताच नसल्याने या फाइल शोधण्यात मोठ्या प्रमाणात महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा गुंतली होती.
कोणत्याही परिस्थितीत या फाइल मिळणे गरजेचे होते, तसे न झाल्यास प्रति फाइल २५ हजारांचा दंड करण्याचा इशारा शासकीय लेखा परीक्षकांनी दिला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच कामाला लागली.
खरं तर शासकीय लेखापरीक्षण होत असताना वेगवेगळ्या विभागातील महत्त्वपूर्ण फाइल या उपलब्ध होणे गरजेचे आहे. मात्र, केवळ बोटावर मोजण्या इतक्याच फाइल उपलब्ध होत असतील तर मग अन्य फाइल या गेल्या कुठे? त्या का सापडत नाहीत? या फाइल तपासल्या गेल्या तर, आपलं पितळ उघड पडेल, या भीतीपोटी तर या फाइल जाणीवपूर्वक गायब केल्या गेल्या नसतील ना?, अशी शंका ही यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे. आणि तशी चर्चाही महापालिका वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह त्यांनी मुख्यलेखापाल कार्यालय गाठले. रात्री नऊ वाजेपर्यंत ते या ठिकाणी ठाण मांडून बसले होते. त्यांनी यावेळी चांगलीच झाडाझडती घेतली आणि सगळ्यांना या संदर्भात जाब ही विचारला. अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांनी सर्वांचीच जणू हजेरी घेतली.
आयुक्तांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे यासाठी संबंधित कर्मचारी अधिकारी गडबडून गेले होते. अखेर याप्रश्नी त्यांनी महापालिकेचे मुख्यलेखापाल डॉ. रत्नराज जवळगेकर यांच्यासह तिघाजणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माझ्या कार्यकाळातील हे प्रकरण नाही : डॉ. जवळगेकर
सध्या महापालिकेत करण्यात येत असलेले लेखापरीक्षण हे सन २०१८-१९ व २०१९-२० या कार्यकाळातील आहे. संबंधित ऑडिटर अधिकाऱ्यांनी त्या त्या विभागाच्या विषयाच्या फायलीची मागणी केली असल्याची प्राथमिक माहिती आहे. सद्यःस्थितीत माझ्या कार्यकाळाशी आणि मुख्य लेखापाल कार्यालयाशी निगडित हे लेखापरीक्षण प्रकरण नाही, अशी माहिती डॉ. रत्नराज जवळगेकर यांनी दिली आहे.