Solapur Municipal Corporation Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur : गुंठेवारीचा विषय मार्गी लावा! महापालिका आयुक्तांना...

टेंडरनामा ब्युरो

सोलापूर (Solapur) : रविवारपेठ येथे लिंगायत समाजातील नागरिकांसाठी दोन एकर जागेत स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी तसेच हद्दवाढ भागातील नागरिकांचा गुंठेवारीचा विषय मार्गी लावण्यात याव्यात, अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना दिल्या.

मंगळवारी महापालिकेत आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत प्रामुख्याने रविवार पेठ येथील लिंगायत स्मशानभूमी, गुंठेवारी शिबिर आयोजित करणे आणि शहरातील दोन उड्डाणपूल कामाची स्थिती या तीन विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

रविवार पेठ येथील आरक्षित दोन एकर जागा लिंगायत स्मशानभूमीसाठी देण्यात यावी. त्यासंबंधीची कार्यवाही त्वरित करावी तसेच महापालिकेकडे प्राप्त असलेले प्रकरण आणि नागरिकांना वैयक्तिक मोजणीसाठी गुंठेवारी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करावे. त्यासाठी सयुक्तिक शिबिराचे आयोजन करावे असेही, आमदार देशमुख यांनी सांगितले.

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व नगररचना विभाग यांच्या समवेत मंजूर दोन्ही उड्डाणपुलाच्या कामाच्या स्थितीबाबत आढावा घेतला. आयुक्तांनी या बैठकीत उड्डाणपूल जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्यात आले, असून जून महिन्यात उड्डाणपुलासाठी जमीन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाकडे सुपूर्द करण्यात येईल.

जून-जुलै महिन्यात उड्डाणपुलाच्या कामाची टेंडर प्रक्रिया राबवून प्रत्यक्षात काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले. तसेच लिंगायत स्मशानभूमीसाठी जागा देण्याबाबतही प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगितले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे उपस्थित होते.