सोलापूर (Solapur) : भय्या चौकातील धोकादायक रेल्वे पुलावरील जडवाहतूक आठ महिन्यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने बंद केले. नवीन पूल बांधणीसाठी ३५ कोटी रुपयांचे टेंडर (Tender) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काढले. परंतु जुना पूल पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिली नसल्याने रेल्वे पुलाचे काम रखडलेले आहे.
सोलापूर शहरातील सर्व तसेच शहराबाहेरून येणारे बस, एस.टी., ट्रक, ट्रेलर आदी सर्व जड वाहनधारकांना भैय्या चौक रेल्वे पुलावरून १६ जून २०२४ रोजी मार्ग बंद करण्यात आले. भय्या चौक ते मरीआई चौक या दरम्यान असलेला हा रेल्वे पूल १०० वर्षांपूर्वीचा असून तो जीर्ण झाला आहे.
वाहतुकीसाठी हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे या पुलावरील जडवाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली. त्यासाठी पुलावर २.४ मीटरचा हाईट गेज लावण्यात आले. ही वाहतूक बंद केल्यानंतर वर्षभरात पूल बांधणे आवश्यक होते. जडवाहतुकीसाठी हा मार्ग बंद होऊन आठ महिने उलटले.
या कालावधीत केवळ टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जुना पूल पाडण्यासाठी मान्यता द्यावी, याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
या प्रस्तावाला तीन महिने झाले. या प्रस्तावाला शासनाकडून मान्यता प्राप्त झाले नाही. त्यामुळे हे कामदेखील जैसे थेच राहिले आहे. हे काम सुरू करण्यासाठी वर्षाची मुदत होती. या मुदतीत काम पूर्ण झाल्यास सध्या सुरू असलेल्या वाहनांसाठी हा मार्ग बंद करण्याची नामुष्की ओढविणार आहे.