सोलापूर (Solapur) : सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवरील ९ ठिकाणच्या वाळू लिलावासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
लिलावात सहभागी होण्यासाठी शुक्रवार (ता. २०) अंतिम दिवस होता. लिलावात सहभागी होण्यासाठी पूर्वी १३ जूनपर्यंतची मुदत होती. कमी प्रतिसाद मिळाल्याने सात दिवसांची म्हणजे २० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
दाखल झालेल्या टेंडर बुधवारी (ता. २५) उघडण्याचे नियोजित आहे. वाळू लिलावासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार की ठरल्याप्रमाणे बुधवारी लिलाव होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अक्कलकोट तालुक्यातील खानापूर व देवीकवठा दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे व लवंगी येथील वाळू घाटातून ५३ हजार ४४६ ब्रास वाळूचा लिलाव काढण्यात आला आहे. या लिलावातून शासनाला किमान ३ कोटी २० लाख ६७ हजारांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.
मोहोळ व मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मिरी-तांडोर येथील वाळू घाटातून १५ हजार ७१० ब्रास वाळूचा उपसा केला जाणार आहे. या वाळू घाटातून ९४ लाख २६ हजार १४८ रुपयांचा किमान महसूल शासनाला अपेक्षित आहे. पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथून १३ हजार ३८७ ब्रास वाळू उपसा केला जाणार आहे. येथून शासनाला किमान ८० लाख ३२ हजार रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.
माढा तालुक्यातील आलेगाव खु., टाकळी टें., गारअकोले येथून ५० हजार ५५० ब्रास वाळू उपसा केला जाणार आहे. या तालुक्यातून शासनाला किमान तीन कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.