कोपरगाव (Kopargaon) : शहरातील २२७ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार कामाच्या टेंडर प्रक्रियेच्या तांत्रिक पूर्ततेचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान, उपमुख्याधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.
शहरातील भुयारी गटार योजनेच्या २२७ कोटी रुपयांच्या ई-टेंडर प्रक्रियेचा आज शेवटचा दिवस होता. एका ठेकेदार कंपनीचा प्रतिनिधी म्हणून स्थानिक ठेकेदार काम पाहतो आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुख्याधिकाऱ्यांकडे तो जिओटॅग फोटोसाठी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येण्याची मागणी तो करत होता. मात्र, अधिकारी उपलब्ध होत नव्हते. आज उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल पालिका कार्यालयात आले.
ठेकेदारासह जिओ टॅग फोटोसाठी जात असताना उपमुख्याधिकाऱ्यांचा रक्तदाब व रक्तातील साखर वाढली. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना इतर अधिकाऱ्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अधिकारी देखील पालिकेचे कामकाज बंद ठेवून रुग्णालयात आले. या सर्व प्रकारामुळे टेंडरची प्रक्रिया ठप्प झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अधिकारी पालिकेत आले नव्हते. त्यानंतर एक अधिकारी आला व त्याने सदर ठेकेदाराचा लेखी अर्ज घेतल्याची चर्चा होती. दरम्यान, मुख्याधिकारी सुहास जगताप हे नाशिक आयुक्त कार्यालयात बैठकीसाठी गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.