श्रीरामपूर (Shrirampur): श्रीरामपूर तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कामावर गंभीर अनियमितता असल्याचे समोर आले आहे. ११ गावांमध्ये १०० टक्के काम पूर्ण झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा असून, प्रत्यक्षात केवळ ४० ते ५० टक्केच काम झालेले आहे.
या फसव्या अहवालांबद्दल आमदार हेमंत ओगले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अपूर्ण कामे पूर्ण झाल्याचे दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, तसेच काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून नवीन टेंडर काढावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेत आमदार ओगले बोलत होते. तहसीलदार मिलिंद वाघ, जिल्हा परिषद ग्रामिण पाणीपुरवठ्याचे अभियंता हितेंद्र चव्हाण, गटविकास अधिकारी सुभाष म्हस्के, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठ्याचे अभियंता रवींद्र पिसे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, अण्णासाहेब डावखर, राधाकृष्ण बोरकर, ज्ञानेश्वर मुरकुटे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर प्रत्येक कामाचा तपशील बोर्डवर लावणे सक्तीचे करावे. अपूर्ण काम पूर्ण दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणारच. टाकळीभानसारख्या मोठ्या गावाला केवळ दोन कोटींचा प्रस्ताव पाठिवण्यात आला होता. आता त्यात वाढ करून १८ कोटींचा प्रस्ताव सादर केला गेला. या तुलनेत इतर छोट्या गावांना कोटींचे प्रस्ताव का, असा सवाल त्यांनी उपस्थित करून वर्षानुवर्षे कामे अडकवणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून नवे टेंडर काढा, असा इशारा ओगले यांनी दिला.
सचिन गुजर यांनी गुजरवाडीतील ठेकेदार मनमानी करत असल्याचे सांगितले. ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी अधिकारी आपल्या मनाने कामे करीत असून, माहिती लपवली जाते, असा आरोप केला. तालुक्यात कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर होऊनही गावकऱ्यांना पाण्याचा थेंब न मिळणे, ही जनतेची मोठी फसवणूक असल्याचे चित्र कार्यशाळेत उभे राहिले.
गावागावांतील वास्तव
जाफराबाद येथे १ कोटी ३० लाखांचा प्रस्ताव असताना काम फक्त ४६ लाखांत पूर्ण; मग ५७ लाख रुपये वाढवून का मागितले, असा प्रश्न ओगले यांनी उपस्थित केला. दिघीमध्ये पाण्याची टाकी व पाइपलाइन अपूर्ण. मुठेवडगावात योजना पूर्ण पण हस्तांतरण न झाल्याने पाणी नाही. हरेगावात दाखवलेले काम पूर्ण नाही; प्रत्यक्षात एक विहीर अपूर्ण व दुसरी अस्तित्वातच नाही. अनेक गावांमध्ये विहिरी अपूर्ण, टाक्या न झालेल्या, पाइपलाइन अर्धवट. काही ठिकाणी काम सुरू असूनही सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनाच माहिती नाही, अशी स्थिती असल्याचे सांगण्यात आले.