Sand
Sand Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

सातारकरांना अशी खरेदी करता येणार ऑनलाइन वाळू; टेंडर निघाले...

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : शिंदे-फडणवीस (Shinde - Fadnavis) सरकारने ऑनलाइन वाळू (Sand) विक्रीचे धोरण आणले आहे. त्यासाठी सातारा जिल्ह्यात वाळू ठिय्या करून तेथून मागणीनुसार वाळू उपलब्ध करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचा साठा करण्यासाठी टेंडर (Tender) काढण्यात आल्या आहेत.

वाई तालुक्यातील नदीपात्रातून सर्वप्रथम वाळू काढण्यात येणार आहे. या वाळूचा साठा शासकीय जागेत केला जाणार आहे. तेथून ग्राहकांना मागणीनुसार सहाशे रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध केली जाणार आहे.

वाळूचा अवैध वाहतूक व चोरी रोखण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने ऑनलाइन वाळू उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सहाशे रुपये ब्रासप्रमाणे ही वाळू ग्राहकांना दिली जाणार आहे. त्यासाठी शासकीय जागेत वाळूचा साठा केला जाणार आहे. जिल्ह्यात प्रथमच वाई तालुक्यातील चार ठिय्यांतून वाळू काढण्यात येणार आहे. नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचा शासकीय जागेत साठा करण्यासाठी महसूल विभागाने टेंडर काढले आहे.

ग्राहकांना साठा केलेल्या ठिकाणाहून वाळू आपापल्या वाहनाने ही वाळू न्यावी लागणार आहे. त्यासाठी ऑनलाइन मागणी व पैसे भरावे लागतील. तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करून त्याचा साठा करण्यासाठी झालेला खर्चही ग्राहकांना भरावा लागणार आहे. त्यामुळे साठा केलेल्या ठिकाणी सहाशे रुपये ब्रासने वाळू मिळणार असली तरी, त्यामध्ये वाळू नदीपात्रातून काढण्यासाठी आलेला खर्चाचाही समावेश होणार आहे.

सध्या वाई तालुक्यातील कृष्णा नदीपात्रातील चार ठिय्यातून वाळू उपसा केला जाणार आहे. त्यासाठी नदीपात्राचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. सातारा, कऱ्हाड या तालुक्यांत नदीपात्रातून वाळू उपसा करताना पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

प्रशासनाकडून काळजी...

वाळू उपशामुळे नदीपात्र वळणे किंवा पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणची वाळू जिल्हा प्रशासन काढणार नाही. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण न होण्याची काळजी प्रशासन घेत आहे.