Satara Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : 'त्या' 14 गावांचा पाणीप्रश्न लवकरच मिटणार

टेंडरनामा ब्युरो

खंडाळा (Khandala) : नीरा- देवघर सिंचन योजनेमुळे २७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. सिंचनापासून वंचित असणाऱ्या १४ गावांचे सर्वेक्षण सध्या सुरू असून, हा ही प्रश्न लवकर मार्गी लावणार आहे, तसेच तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे काम कौतुकास्पद असून, वाई व खंडाळा पंचायत समितीच्या इमारतीसाठी २५ कोटींची तरतूद लवकरच करणार असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.

मंत्री पाटील म्हणाले, नीरा- देवघर कॅनॉलचे पाणी वाघोशीपर्यंत आणले आहे. पुढे १० किलोमीटर लोणंदपर्यंतच्या कॅनॉलचे काम गतीने सुरू आहे. तालुक्यातील २७ हजार एकर क्षेत्र या कॅनॉलमुळे ओलिताखाली येणार आहे. याचप्रमाणे तिन्ही उपसा सिंचनबाबतची टेंडर नोटीस लवकरच वर्तमानपत्रात पाहायला मिळणार असून, वंचित १४ गावांच्या पाणीप्रश्नाबाबत सर्वेक्षण सध्या सुरू आहे. यामुळे पूर्ण तालुक्यात भविष्यात शेती पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवणार आहे.

पंचायत समितीचे अपंग क्रीडा स्पर्धा, प्रज्ञा शोध, सैनिक स्कूल व शिष्यवृतीसाठी राबवलेले उपक्रम हे जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरले असल्याचे सांगत त्यांनी मराठी शाळेच्या वाढत्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात गेल्या तीन वर्षांतील एकूण ३३ शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले, तर तालुका आदर्श वर्ग, आदर्श शाळा, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व नवोदय विद्यालय पात्र विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात झाला. दरम्यान, मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल मकरंद पाटील यांचा शिक्षकांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.