Satara
Satara Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

सातारकरांना दिलासा; भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तास ठेकेदार नेमणार

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : शहरासह उपनगरांत भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. पालिकेकडून त्‍याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्‍याच्‍या नागरिकांकडून तक्रारी होत्‍या. त्यांच्या तक्रारींची दखल घेत पालिकेने भटक्‍या कुत्र्यांच्‍या निर्बीजीकरणाची निविदा प्रक्रिया पुन्‍हा एकदा राबविण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रशासकीय कार्यवाही पालिकेत सुरू आहे. येत्‍या काही दिवसांत त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

शहर आणि उपनगरात भटक्‍या कुत्र्यां‍च्‍या संख्‍येत गेल्‍या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ झाली आहे. या भटक्‍या कुत्र्यांच्‍या झुंडी बाजारपेठेसह शहराच्‍या गल्‍लीबोळात फिरताना दिसतात. या झुंडीकडून नागरिकांवर हल्‍ले चढविण्‍याच्‍या घटनाही घडल्‍या होत्‍या. कोरोना, लॉकडाऊनच्‍या काळात सोनगाव कचरा डेपो परिसरातील भटक्‍या कुत्र्यांनी सोनगाव, जकातवाडीसह परिसरातील नागरिकांवर हल्‍ले चढवले होते. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर पालिकेने त्‍याबाबतच्‍या उपाययोजना राबविण्‍याचा निर्णय घेतला. मात्र, त्‍याला मुहूर्त लागत नव्‍हता. दोन वर्षांनंतर सरतेशेवटी याबाबतची कार्यवाही झाली. एका संस्‍थेस ते काम दिले. हे काम देखील इतर कामांप्रमाणेच नेहमी चर्चेत राहात होते. कोणत्‍या भागातील भटकी कुत्री पकडली, किती कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले, त्‍यांना पुन्‍हा त्‍यांच्‍याच अधिवासात सोडले का ? याची कोणतीही ठोस माहिती पालिका तसेच, ते काम करणाऱ्या संस्‍थेकडून अखेरपर्यंत मिळाली नाही.

थोड्याफार कारवायांचा डांगोरा पिटल्‍यानंतर ते काम करणाऱ्या संस्‍थेचे काम फक्‍त कागदोपत्रीच सुरू होते, अशी माहिती पालिकेतून मिळत आहे. सरतेशेवटी असमाधानकारक, मुदत संपल्‍याच्‍या मुद्द्यावर त्‍या संस्‍थेचे काम थांबविल्‍याचे तांत्रिक बाजूवर सांगण्‍यात येत असले, तरी हा निर्णय घेण्‍यास इतका विलंब का लागला? हाही प्रश्‍‍न अनुत्तरीत आहे. हे काम पुन्‍हा खासगी संस्‍थेच्‍या मदतीने हाती घेण्‍याचे पालिकेने ठरवले आहे. यासाठीची तांत्रिक प्रक्रिया सुरू असून, येत्‍या काही दिवसांत त्‍यावर अंतिम निर्णय होईल. या निर्णयानंतर तरी भटक्‍या कुत्र्यांच्‍या अनुषंगाने ठोस कार्यवाही करेल, अशी अपेक्षा आहे.

लाखोंचा चुना...

गतवर्षी पालिकेच्‍या वतीने भटक्‍या कुत्र्यांच्‍या निर्बीजीकरणासाठीचा ठेका एका संस्‍थेस दिला होता. या संस्‍थेस साताऱ्यातील काही लोकप्रतिनिधींचे पाठबळ होते. त्यावर या संस्‍थेने भटक्‍या कुत्र्यांना पकडत त्‍यांचे निर्बीजीकरणाच्‍या हाताच्‍या बोटावर मोजता येतील इतक्‍याच कारवाया केल्‍या. कागदोपत्री सोपस्‍काराच्‍या माध्‍यमातून पालिकेस लाखोंचा चुना लागल्‍याची चर्चा सुरू आहे.