Ajinkyatara Fort
Tendernama
सातारा (Satara) : पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी ६० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली. मात्र, या विकास कामांसाठी पुरातत्व विभागाची परवानगी असल्याशिवाय पालिकेला या कामांचे टेंडर काढता येत नाही. त्यामुळे हा तरतूद केलेला निधी खर्च करण्यासाठी पुढील वर्षाच्या नगरोत्थान अभियानातील निधीची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
दरम्यान, सध्या पालिकेने केवळ अजिंक्यतारा किल्ल्याच्या परिसरातील चारभिंतीचे सुशोभिकरण व किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बसविण्याचे काम केले आहे. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी पुढील वर्षाची वाट पहावी लागणार आहे. गेल्या वर्षी सातारा शहराच्या हद्दवाढीचा निर्णय झाला. त्यामुळे सातारा शहराच्या परिसरातील काही उपनगरांचा पालिकेच्या हद्दीत समावेश झाला. तसेच अजिंक्यतारा किल्ल्याचा ही समावेश झाल्याने सातारा पालिकेने अजिंक्यतारा किल्ल्याच्या विकास व सुशोभिकरणासाठी पहिल्याच सर्वसाधारण सभेत ६० लाखांची तरतूद केली.
या निधीतून दरवाजांच्या भागाचे सुशोभिकरण, वाडे व राज सदरे दुरूस्ती, दारू गोळा कोठार, विहिरींची दुरूस्ती व सुशोभिकरण आदी बाबींचा समावेश केला जाणार होता. पण, तोपर्यंत पालिकेवर प्रशासक नेमण्यात आला. तसेच पालिकेने किल्ला परिसरातील चार भिंती परिसराचे सुशोभिकरण, तसेच स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम केले. रस्त्याची पूर्ण दुरूस्ती होणार होती. पण त्यासाठी निधी जास्त लागत असल्याने हा निर्णय घेतला नाही. तसेच सध्या बसवलेली स्ट्रीट लाईटचे ही नुकसान करण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे या स्ट्रीट लाईटला जाळी लावण्यात येणार आहे. पण, अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी पालिकेला पुरातत्व विभागाची परवानगी लागणार आहे. त्यांची परवानगी मिळाली तरच टेंडर काढता येणार आहे. त्यामुळे सध्या पालिकेने तरतूद केलेल्या ६० लाखांचा निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्याच्य विकासासाठी तरतूद केलेला हा निधी पुढील वर्षी नगरोत्थान अभियानातून वापराला जाणार आहे. त्यामुळे अजिंक्यतारा किल्ल्याच्या विकास कामांसाठी किमान आणखी वर्षभर तरी वाट पाहावी लागणार आहे.
सातारा पालिकेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडीची सत्ता आहे. आघाडीच्या नेत्यांनी पुढाकार घेत अजिंक्यतारा किल्ल्याचा विकास व सुशोभिकरणावर भर दिला तर ऐतिहासिक किल्ल्याच्या वैभवात भर पडणार आहे.