ST Buses Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : जिल्ह्यात 70 नव्या एसटी बस दाखल; 20 इलेक्ट्रिकल, 50 लालपरींचा समावेश

टेंडरनामा ब्युरो

सातारा (Satara) : प्रदूषणमुक्त प्रवासासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध डेपोंमध्ये पर्यावरणपूरक २० इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. या बसमुळे प्रदूषण कमी होणार असून, प्रवाशांना आरामदायी व वातानुकूलित प्रवास करता येणार आहे. याचबरोबर गेल्या आठवडाभरात ५० लालपरी एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून, पाच डेपोंना दहा बस देण्यात आल्या आहेत. वाढत्या बसच्या संख्येमुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन सेवेत अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे सर्वत्र राज्य सरकारचे धोरण आहे. त्यासाठी राज्यभरात विविध डेपोंना ई-बस दिल्या जात आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने सातारा विभागात ई-बस दाखल ताफ्यात दाखल होत आहेत. मागील महिनाभरात एकूण २० ई-बस मिळाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील विविध डेपोंमध्ये प्रवाशांच्या तुलनेत बसची संख्या कमी होती. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी, नोकरदार व अन्य सर्वच प्रवाशांना प्रवास करताना कसरत करावी लागत होती. मात्र, मागील काही महिन्यांत विविध डेपोंना ई-बस व लालपरी मिळाल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी होत आहे. जिल्ह्यातील विविध डेपोंमध्ये बसची संख्या वाढत असल्याने बहुतांशी भागातील प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

या डेपोंसाठी लालपरीच्या प्रत्येकी दहा बस दाखल

दहिवडी, फलटण, मेढा, पाटण, सातारा

सातारा विभागासाठी १५० बसचा प्रस्ताव

सातारा एसटी विभागाने एकूण १५० लालपरी व ई-बसचा प्रस्ताव विभागीय कार्यालयांकडे पाठविण्यात आला आहे. यामधील टप्प्याटप्प्याने बस मिळणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यातील दहा डेपोंमध्ये ५० लालपरी दाखल झाल्या आहेत. एसटी प्रशासनाने जिल्ह्यातील विविध डेपोंसाठी १५० लालपरी व इलेक्ट्रिक बस मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला असून, टप्प्याटप्प्याने या बस मिळणार आहेत. सातारा विभागात बसच्या वाढत्या संख्येमुळे प्रवाशांची गैरसोय कमी होत आहे.

- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, सातारा