Irrigation
Irrigation Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

'या' तालुक्याची दुष्काळ मुक्तीच्या दिशेने वाटचाल; सिंचन योजनेस 8272 कोटींची सुप्रमा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सांगली जिल्ह्यातील ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेस ८ हजार २७२ कोटी रुपयांची पाचवी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे (Suresh Khade) यांनी दिली.

या प्रकल्पातील म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेसाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये १ हजार ९३० कोटी रूपये मंजूर आहेत. त्यापैकी विविध कामांची ९८१ कोटींची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण ५७ किलोमीटरपैकी आठ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, टेंभू विस्तारीत उपसा सिंचन प्रकल्पाला नुकतीच सव्वा ७ हजार कोटींची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सद्यस्थितीत या योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दोन्ही योजनांचे काम पूर्ण झाल्यानंतर जत तालुका दुष्काळमुक्त होईल, असेही त्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग हा कायम पाण्यापासून वंचित व दुष्काळी म्हणून ओळखला जात होता. दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांनी जिल्ह्याच्या पूर्व भागासाठी पाणी योजना तयार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यातूनच पुढे टेंभू, ताकारी, म्हैसाळ, आरफळ या योजना सुरू झाल्या. टप्प्याटप्प्याने या योजनांचा विस्तार होत गेला. मात्र जत तालुक्यातील ४८ गावे पाण्यापासून वंचित आहेत. पाण्यासह विविध प्रश्नाबाबत तालुक्यातील या गावांनी अनेक वेळा आवाज उठवला. अखेरीस काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता.

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा जत तालुक्यातील १२५ पैकी ७७ गावांना लाभ मिळत आहे. मात्र पूर्व भागातील उर्वरित गावे पाण्यापासून वंचित होती. त्यांना पाणी देण्यासाठी राज्य शासनाने विस्तारित म्हैसाळ योजनेमधून 'जत उपसा सिंचन योजना' नावाने प्रकल्प मंजूर केला आहे. सुरुवातीस या योजनेसाठी ५ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यात १ हजार कोटींची दरवाढ आणि आणखी २ हजार कोटी असे ८ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते.