MIDC
MIDC Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

नगर जिल्ह्यात 'या' मोक्याच्या ठिकाणी एमआयडीसी प्रस्तावित; 618 एकर जमिनीवर नियोजन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अहमदनगर येथील बेलवंडी गावातील ६१८ एकर जमिनीवर नवीन एमआयडीसी उभारण्याचे प्रस्तावित करण्यात येत असून, यामुळे जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. बेलवंडी येथील जमिनीवर नवीन एमआयडीसी स्थायित करण्यासंदर्भात मोजणी व पाहणी करून मोजणीचा अहवाल सादर करावा तसेच पुढील प्रकियेस गती देण्याचे निर्देश यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

बेलवंडी हे मोक्याचे ठिकाण असून येथून शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक आहेत, त्याचबरोबर येथे पाणी, वाहतूक आणि दळणवळणाची साधने उपलब्ध आहेत. मंत्रालयात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’च्या समस्यांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फार्म येथे शेती महामंडळाची जमीन उद्योग विभागाला ‘एसआयडीसी’साठी देण्यास तत्वत: मान्यता देण्यात आली. बेलवंडी येथे नवीन ‘एमआयडीसी’ संदर्भातील कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

बेलवंडी येथे शेती महामंडळाची मौजे पर्वतवाडी आणि महादेववाडी येथे वाहतूकीची व पाण्याची तसेच रेल्वे वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. बेलवंडी हे मोक्याचे ठिकाण असून या ठिकाणापासून शिर्डी, पुणे आणि नाशिक एमआयडीसी केंद्र नजीक आहेत, त्याचबरोबर पाणी, वाहतूक आणि दळणवळणाची साधने उपलब्ध असल्याने येणाऱ्या काळात बेलवंडी उद्योजकांना मोठी पर्वणीच ठरणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ही उद्योग नगरी विकसित करण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पाठपुरावा केला.

यावेळी, श्रीरामपूर तालुका व राहता तालुक्यातील शेती महामंडळाकडे असलेल्या जमिनीच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटादार वर्ग १ करणे तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ शेती महामंडळाची जमीन वाटप करणे संदर्भातील कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उद्योगमंत्री सामंत, यांच्यासह माजी मंत्री पाचपुते, खासदार डॉ.  सुजय विखे पाटील उपस्थित होते. तर मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.