सांगोला (Sangola) : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील तीनशे कोटी रुपयांच्या कामाचा भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १४) चिकमहूद येथे होणार असल्याची माहिती माजी आमदार शहाजी पाटील यांनी दिली.
माजी आमदार पाटील म्हणाले, की सन २००० साली ७८ कोटी ५९ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता या योजनेला मिळाली होती. परंतु पुढील पाच वर्षे या योजनेवर कोणताही खर्च झाला नसल्याने २००५ साली प्रशासकीय मान्यता रखडली. २०१९ साली आमदार झाल्यानंतर आपण या योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न सुरू केले. या योजनेचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सांगोला असे नामकरण शासनाकडून मंजूर करून घेतले आणि नव्याने १० गावांचा या योजनेमध्ये समावेश करून एकूण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष २२ गावातील शेतकऱ्यांना या योजनेतून दोन टीएमसी पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी सुधारित अंदाजपत्रक तयार करून ८८३ कोटी ७४ लाख रुपयांच्या कामाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर करून घेतली. या योजनेच्या ८८४ कोटी रुपये खर्चाच्या या योजनेतील पहिल्या टप्प्यातील कामांची निविदा विधानसभा निवडणुकीपूर्वीच प्रसिद्ध होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाचे आदेश देण्यात आले होते. परंतु निवडणूक आचारसंहिता व मंत्रिमंडळ निवडणुकीमुळे कामाचे भूमिपूजन लांबले होते. पण आता ते होत आहे, असे ते म्हणाले.
१३ हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली
या योजनेचे कामामुळे सांगोला तालुक्यातील २२ गावांमधील सुमारे १३ हजार ५५ हेक्टर शेतजमिनींना बंदिस्त नलिकेद्वारे शेतीला लवकरच कायमस्वरूपी पाणी मिळणार असल्याने सांगोला तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी संपणार असून पुढील टप्प्यातील उर्वरित कामांनाही लवकरच सुरवात होणार असल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली.