कोल्हापूर शहरातील कचरा उचलण्यासाठी महापालिकेने ६५ टिप्पर वाहने खरेदी करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी १३ कंपन्यांनी निविदा दाखल केली होती. प्राथमिक छाननीनंतर पात्र ठरलेल्या तीन कंपन्यांमधून घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टची निविदा मंजूर करण्यात आली. ३.३७ कोटी अशा सर्वात कमी दरात वाहने उपलब्ध करण्याचा आणि देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टने घेतल्याने त्यांना या कामाचे कंत्राट देण्यात आले.
कोल्हापूर शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे. त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्न होत आहेत; परंतु कचरा संकलन ही सर्वांत मोठी अडचण आहे. शहरात दररोज अडीचशे ते तीनशे टन कचरा जमा होतो. शहरातील कचऱ्याचे ढिगारे हटवल्यानंतर गल्लोगल्ली आणि घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेला टिप्पर वाहनांची गरज होती. यापूर्वीही महापालिकेने काही टिप्पर वाहने खरेदी केली होती. आता त्यामध्ये आणखी ६५ वाहनांची भर पडणार आहे. टिप्पर वाहने खरेदी करण्यासाठी सुमारे ३ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यासाठीची निविदा पालिकेने प्रसिद्ध केली होती. त्याला १३ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यामध्ये मे. गौरीक इंडिया लिमिटेड कोलकाला, मे. भन्साली ऑटोमोटिव्ह अहमदनगर, पी.एस. उद्योग राजस्थान, मे. कॉन्टीनेटल इंजिन्स प्रा.लि. हरयाणा, टाटा मोटर्स मुंबई, मे.एम.के.टेक इंडस्ट्रीज गाजियाबाद, युनायटेड पेट्रोलियम प्रा.लि.दिल्ली, कदम एंटरप्राइजेस ऑटोलाईन कोल्हापूर, मे. उमा मोटर्स प्रा. लि., मे.घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट कोल्हापूर, माय कार पुणे, पिपाडा मोटर्स अहमदनगर, नेचर ग्रीन टूल्स कानपूर या कंपन्यांचा यामध्ये समावेश होता. या निविदांतून तीन निविदांची निवड केली होती व सर्वात चांगली बजेट असलेल्या मे. घाटगे पाटील इंडस्ट्रीजला या कामाचे कंत्राट देण्यात आले.