Karad Nagarpalika
Karad Nagarpalika Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडला ठेकेदार-अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष;प्रकल्पाचे वाजणार तीन तेरा?

टेंडरनामा ब्युरो

कऱ्हाड (Karhad) : अधिकारी व ठेकेदारांच्या समन्वयाअभावी स्वच्छ सर्वेक्षणात देशात दोनवेळा पहिला क्रमांक मिळवलेल्या येथील पालिकेचा घनकचरा प्रकल्प डबघाईला आला आहे. कचरा डेपोची हेळसांड सुरू असून, ओल्या कचऱ्यावर प्रक्रियाच ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे. तब्बल १८ टनापेक्षाही जास्त ओला कचऱ्यावरील विलगीकरणाची यंत्रणा थंड पडल्याने कचऱ्याचे ढीग साचत आहेत. अधिकारी-ठेकेदारांच्या अक्षम्य दुर्लक्षाने नावाजलेला कचरा डेपो अडचणीत आला आहे. ओल्या कचऱ्यासह प्लॅस्टिकचा कचरा विलगीकरणाशिवाय खड्डा काढून पुरला जातो आहे.

येथील पालिकेने २०२० व २०२१ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला क्रमांक पटकवला. यंदा हॅटट्रिक हुकली असली, तरी स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर निश्‍चित गौरव झाला. त्यात घनकचरा प्रकल्प मैलाचा दगड आहे. तत्कालीन आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी विशेष प्रयत्न केले. कचरा डेपोत बाग, झीरो किलोमीटर ऑक्सिजन झोन आदी संकल्पना राबवल्या आहेत. घनकचरा प्रकल्पाच्या डीपीआरला सहा कोटींचा निधी शासनाने दिला आहे. त्यावरही कोणतीही हालचाल दिसत नाही. शहरातून वेगवेगळ्या प्रकारचा दररोज ३२ टनांच्या कचरा येतो. त्यावर प्रक्रिया केल्याचा दावा पालिका करत असली, तरी अलीकडच्या काळात त्याची हेळसांड झाल्याचे वास्तव आहे.

ठेकेदारांसह अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घनकचरा प्रकल्पास गालबोट लागल्याची स्थिती आहे. ओला कचरा प्रक्रिया तसाच पडून राहतो आहे. खड्डा काढून किंवा जाळून त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. त्या सगळ्या प्रकाराची चौकशी होण्याची गरज आहे. मागील आठवड्यात प्लॅस्टिकचा चार दिवस कचरा डेपो जाळलेल्या कचऱ्यामुळे धुमसत होता. तर काही कचरा बारा डबरी परिसरात मोठा खड्डा काढून पुरला गेला. त्यात प्लॅस्टिक कचऱ्याचाही समावेश आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया न होताच खड्डा गाडल्याचा प्रकार उघडकीस येऊनही कोणावरही कारवाई झालेली नाही. ओला कचऱ्याचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे ठेकेदारांवर अंकुशाची गरज आहे.

यंत्रांकडेही दुर्लक्ष...
शहरातून कचरा डेपोवर येणारा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. ती बंद पडल्यास एका दिवसात दुरुस्त करण्याची ठेकेदार, अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे ती कचऱ्याची यंत्रणा बंद पडली, की मोठमोठे ढीग कचरा साचून राहत असल्याचे वास्तव आहे. त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहे.