Solapur Airport Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Airport : सोलापूरकरांना लवकरच मिळणार गुड न्यूज

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सोलापूरहून मुंबई व गोव्यासाठी २० डिसेंबरला विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सोलापूर व मुंबई विमानतळावर सकाळच्या वेळेची (स्लॉट) मागणी केली आहे. तसा प्रस्तावही ‘डीजीसीए’कडे (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) पाठविला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही.

‘डीजीसीए’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर दुपारी बाराच्या सुमारचा स्लॉट मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. 'फ्लाय ९१'ने देखील अद्याप वेळेबाबत निश्चित असे काही सांगता येणार नसल्याचे सांगितले.

सोलापूर - मुंबई व सोलापूर - गोवा (मोपा विमानतळ) विमानसेवा ‘फ्लाय ९१’ ही कंपनी देणार आहे. 'व्हीजीएफ' (व्हायबिलिटी गॅप फंडिंग) योजने अंतर्गत ही सेवा सुरू होणार असल्याने याचे तिकीट दर सामान्य प्रवाशांच्या आवाक्यात असणार आहे. सुमारे २ हजार ते २ हजार २०० असे याचे प्रति प्रवासी तिकीट दर असणार आहे.

सोलापूरहून मुंबईला सकाळच्या वेळी विमानसेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभेल. दुपारच्या वेळी कमी प्रतिसाद लाभण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच विमानसेवेची वेळ सकाळची मिळावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सोलापूर - मुंबई या प्रवासासाठी एटीआर ७२ - ६०० या प्रकारचे विमान वापरले जाणार आहे. हे विमान एअरबस व बोईंग तुलनेने छोटे आहे. तर दुसरीकडे मुंबई विमानतळ जगातील व्यस्त विमानतळांपैकी एक असल्याने येथे विमानांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. एअरबससारखे विमान देखील लँडिंगसाठी प्रतीक्षेत असतात. तेव्हा एटीआर - ७२ विमानाला सकाळचा स्लॉट मिळणे अवघड आहे.

सोलापूरचे विमानतळ हे पुण्याच्या हवाईक्षेत्राच्या हद्दीत आहे. पुणे विमानतळावर सुरू असलेली विमान वाहतूक विशेषतः हवाई दलाच्या सुखोई सारख्या विमानांच्या उड्डाणात कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये, यासाठी सोलापूरचे ‘एटीसी’ एकमेकांच्या संपर्कात राहणे आवश्यक असणार आहे. सोलापूर हवाई नियंत्रण कक्षसाठी (एटीसी) लागणारे सर्व उपकरणे उपलब्ध झाली आहेत. लवकरच त्याची चाचणी सुरू होणार आहे.

विमानसेवेच्या तारखांबाबत व स्लॉटबाबत अद्याप निश्चित असे काही सांगता येणार नाही. ‘डीजीसीए’कडून देखील स्लॉटच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.

- चंद्रेश वंझारा, विमानतळ संचालक, सोलापूर

सोलापूरहून मुंबई व गोव्याला विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘डीजीसीए’कडे विचाराधीन आहे. ‘स्लॉट’बाबत अद्याप काहीच सांगता येणार नाही.

- स्टेला फर्नांडिस, जनसंपर्क अधिकारी, फ्लाय ९१, पणजी