<div class="paragraphs"><p>Ahmednara</p></div>

Ahmednara

 

Tendernama

पश्चिम महाराष्ट्र

झेडपीपासून ग्रामपंचायतीपर्यंत विना टेंडर विकासकामांचा धडाका

टेंडरनामा ब्युरो

अहमदनगर (Ahmednagar) : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या (Ahmednagar Zilla Parishad) मुख्यालयात सध्या अधिकाऱ्यांसाठी दालने उभारण्याचे काम विनापरवानगी व विना टेंडर (Tender) करण्यात आलेले आहे. तोच कित्ता आता गावपातळीवर ग्रामपंचायतींनी (Grampanchayat) गिरविण्यास सुरवात केलेली आहे. विना टेंडरच गाळ्यांचे कामकाज श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील एका गावात करण्यात आल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे करण्यात आलेली आहे. या तक्रारीवर आता प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात विनापरवानगी अधिकाऱ्यांसाठी दालने उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही कामे करताना कोणत्याच प्रकारची टेंडर प्रक्रिया बांधकाम विभागाने राबविलेली नाही. जिल्हा परिषदेत एक नव्हे, तर तब्बल दोन दालने विना टेंडर बनविण्यात आलेली आहेत. गरज म्हणून तातडीने हे काम करण्यात आल्याचे भासविले जात आहे.

हा सर्व प्रकार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला होता. त्यावर वादळी चर्चा होऊन, ते काम बंद ठेवून त्यावर झालेला खर्च जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून वसूल करावा, अशी चर्चा सर्वसाधारण सभेत झाली होती. मात्र, सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयाला फाटा देत संबंधित दालनाचे कामकाज प्रशासनाने मनमानी पद्धतीने उरकले आहे.

सदस्यांचा कार्यकाळ रविवारी संपलेला आहे. या विना टेंडर उभारलेल्या दालनातून आजपासून (सोमवार) कामकाज सुरू झाले आहे. यावरून जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहे.

तसाच काहीसा प्रकार आता श्रीरामपूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतीत झालेला आहे. संबंधित ग्रामपंचायतीने गाळे उभारले आहेत. या गाळ्यांची उभारणी करताना मात्र कोणतेही टेंडर काढण्यात आलेले नाही. कोणतीही मान्यता न घेतातच गाळ्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. यावरून आता तक्रारी सुरू झालेल्या असून, कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन याप्रकरणी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शोधल्यास अनेक प्रकार उघड होणार

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच नव्हे, तर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये अशीच विना परवानगी व विना टेंडर कामे केली जात आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या तारखा टाकून टेंडर व कामांची बिले दाखवून कामे केली जात आहेत. जिल्ह्यातील कामांचा आढावा प्रशासनाने घेतल्यास असे काही प्रकार इतर ठिकाणी होत असल्याचे स्पष्ट होणार आहे.

काळ सोकावायला नको...

'म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये,' या म्हणीप्रमाणे आता प्रशासनाने मुख्यालयात झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. त्यानंतर जिल्ह्यातील इतर कामांची चौकशी करावी, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.