Road work, contractor, workers Tendernama
पश्चिम महाराष्ट्र

सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला अल्टीमेटम

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): सातारा कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पातील एक कंपनी अपेक्षित गतीने काम करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्या ठेकेदाराला पंधरा दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून, या कालावधीत समाधानकारक प्रगती न झाल्यास संबंधित कंत्राट रद्द (टर्मिनेट) करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिली.

मंत्री भोसले म्हणाले की, सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. मात्र काही ठेकेदारांकडून कामात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी यापूर्वीच केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी नुकतीच सातारा-कागल महामार्गासंदर्भात आढावा बैठक घेतली असून, या बैठकीत सुद्धा या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कराड येथील मोठ्या पुलाचे काम सुमारे 83 टक्के पूर्ण झाले असून, अप्रोच रोडसाठी आवश्यक असलेले भूसंपादन व अतिक्रमणाचे प्रश्न आता निकाली निघाले आहेत. त्यामुळे लवकरच पुलाचे उर्वरित कामही पूर्ण होणार असल्याचे यावेळी सांगितले.

हा महामार्ग सातारा, उंब्रज, कराड, कोल्हापूर तसेच बेंगळुरूकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, कोकणात जाणाऱ्या वाहतुकीसाठीही मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या दोन्ही स्तरांवरून या रस्त्याच्या कामावर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, काम वेळेत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहितीही मंत्री भोसले यांनी दिली.

आमदार अतुल भोसले यांनी हिवाळी अधिवेशनात सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता.