Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : वर्क ऑर्डर निघाली पण 'यामुळे' लांबणार पंपिंग स्टेशनचे काम

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी वर्सोवा परिसराची तुंबई टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने मोगरा नाला येथे पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामावर २९४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून कामाची वर्क ऑर्डर ही निघाली आहे. मात्र, अंधेरीतील गोखले पुलाचे काम रखडल्याने मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम सुद्धा लांबणार आहे.

अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी वर्सोवा परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका अधिक असतो. यावर उपाय म्हणून मुंबई महापालिकेने मोगरा नाला येथे पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला असून यासाठी २९४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कामाची वर्क ऑर्डर ही देण्यात आली आहे. डिझाईन व सर्व्हेचे काम प्रगतीपथावर आहे. मोगरा नाला पंपिंग स्टेशनवर ७ पंप बसवण्यात येणार असून यामुळे अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी, वर्सोवा या भागात पावसाळ्यात पाणी जमा झाले, तर त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मोगरा नाला पंपिंग स्टेशन महत्वपूर्ण प्रकल्प ठरणार आहे. मात्र अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. यासाठी सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी गोखले पुलाचे काम प्रत्यक्षात मार्च २०२४ मध्ये पूर्ण होणार आहे. जोपर्यंत गोखले पुलाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम करणे शक्य नाही, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गोखले पुलाचे काम सुरू असून याठिकाणी खाजगी विकासकाचे काम सुरु आहे. त्यामुळे मोगरा नाला पंपिंग स्टेशन उभारण्यात अडचण येत असून विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करावीत यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम तूर्तास पूर्ण होणे शक्य नसल्याने अंधेरी पश्चिम, जोगेश्वरी या भागांतील लोकांना पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा त्रास होऊ नये, यासाठी ३ हजार पावर क्षमतेचे तीन ठिकाणी प्रत्येकी दोन पंप बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या भागातील नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेतल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोगरा नाला पंपिंग स्टेशनच्या कामाची वर्क ऑर्डर दिली असून वर्क ऑर्डर दिल्यापासून पुढील ४२ महिन्यांत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र गोखले पुलाचे काम रखडल्याने मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम लटकले आहे. गोखले पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय येथील पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात अंधेरी, जोगेश्वरी व वर्सोवा परिसरात पाणी तुंबण्याचा धोका वाढला आहे. ऑक्टोबरपर्यंत गोखले पुलाचे काही काम पूर्ण झाल्यानंतर मोगरा नाला पंपिंग स्टेशनचे काम सुरू करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.