uday samant tendernama
मुंबई

Uday Samant: मुंबई महापालिका क्षेत्रात 1 लाख 41 हजार कोटींची पायाभूत सुविधांची कामे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबईच्या विकासासाठी आणि नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा देण्यासाठी शासन आणि महानगरपालिका यांच्यात समन्वयाने काम सुरू आहे. मुंबई महापालिकेत सुमारे एक लाख ४१ हजार ३५६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असून मुंबई महापालिकेस शासनाकडून देय असलेली रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, मुंबईत पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू असून यामध्ये कोस्टल रोड, शहरातील पूल, रस्ते व नद्यांचे पुनरुज्जीवन, मिठी नदी सुधारणा, एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प, स्ट्राँग वॉटर ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण यासारखे महत्त्वाचे प्रकल्प मुंबई शहरात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री डॉ. सामंत म्हणाले, प्राथमिक शिक्षण विभागाकडून मुंबई महापालिकेस देय असलेल्या निधीबाबत सकारात्मक मार्ग काढला जाईल. मुंबई महापालिकेस आरटीई अंतर्गत देय असलेला ८६ कोटी रुपयांचा निधीही तातडीने उपलब्ध करून दिला जाईल. तसेच विविध विभागाकडून मुंबई महापालिकेस देय असलेला १० हजार ९३१ कोटी रुपयांचा निधी टप्याटप्याने दिला जाईल, असेही उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेचे आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे सांगत, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, महापालिकेचे काही भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यातून महापलिकेला अधिकचा महसूल मिळणार असल्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले. आमदार सुनिल शिंदे यांनी विधानपरिषदेत याविषयी प्रश्न उपस्थित केला होता.