Thane Borivali Twin Tunnel project Tendernama
मुंबई

Thane Borivali Twin Tunnel: ठाणे - बोरिवली ट्विन टनल प्रकल्पाची ऐतिहासिक कामगिरी; सर्वात मोठा...

१३.३४ मीटर व्यासाचा सिंगल-शिल्ड टनल बोरिंग मशीनचा (टीबीएम) कटरहेड खाली उतरवण्यात आला

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबईतील दुसरा एक सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आज एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचला आहे.

एमएमआरडीएने ठाणे बाजूच्या पोर्टलचे उत्खनन यशस्वीरीत्या पूर्ण केले असून १३.३४ मीटर व्यासाचा सिंगल-शिल्ड टनल बोरिंग मशीनचा (टीबीएम) कटरहेड खाली उतरवण्यात आला आहे. देशातील कोणत्याही शहरी पायाभूत प्रकल्पात वापरण्यात आलेला हा सर्वात मोठा टीबीएम आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे हा क्रांतिकारी प्रकल्प प्रत्यक्ष बोगदा खोदकाम टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.

११.८ किमी लांबीचा हा भूमिगत ट्विन टनल ठाण्याच्या घोडबंदर रोडला बोरीवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेशी थेट जोडेल. या बोगदा प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवलीपर्यंतचा २३ किमीचा प्रवास, ज्याला सध्या ६०-९० मिनिटे लागतात, तो अवघ्या १५ मिनिटांतच पूर्ण होणार आहे. यामुळे लाखो प्रवाशांना ठाणे आणि बोरिवली दरम्यान थेट व जलद दळणवळणाची सोय मिळून त्यांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे.

याबरोबरच घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीत तसेच संपूर्ण परिसरातील वायू व ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट होईल व या भागाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साध्य होईल. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील रस्ते प्रवासातील ही मोठी क्रांतीच घडणार आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीनं संवेदनशील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणाऱ्या या बोगद्यांसाठी अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, ज्यामुळे अत्यंत सुरक्षित, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक बांधकाम कमीतकमी जमिनीच्या कंपनांसह संभव होणार आहे.

हा प्रकल्प दोन समांतर टनलचा आहे. प्रत्येक टनलमध्ये दोन लेन आणि एक आपत्कालीन लेन (एकूण ३ लेन) असतील. तसेच दर ३०० मीटरवर क्रॉस-पॅसेजेस असतील. बोगद्यात हवा खेळती रहावी यासाठी आधुनिक वायुवीजन प्रणाली, अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, धूर संवेदक आणि एलईडी साईनबोर्ड्स संकेत फलक या बोगद्यांमध्ये बसवले जातील.

हा क्रांतिकारी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणावर कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल, प्रदूषणात घट होईल आणि नागरिकांना वेगवान, स्वच्छ व स्मार्ट प्रवासाचा अनुभव मिळेल.

टीबीएम कटरहेड यशस्वीरित्या खाली उतरवणे हे फक्त अभियंत्रिकी कौशल्याचे उदाहरण नाही तर, मुंबई आता क्लिष्ट भूमिगत मोबिलिटी प्रकल्पांना समर्थपणे पूर्ण करण्यास तयार आहे, याचा पुरावा आहे.

ठाणे-बोरीवली ट्विन टनलसारख्या प्रकल्पांद्वारे एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय लिहीत आहे आणि तिचा संपूर्ण कायापालट घडवत आहे.