Thane Municipal Corporation Tendernama
मुंबई

ठाणे महापालिकेचे आता विद्युत खांबांवर जाहिरातीचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : शौचालय योजना फ्लॉप ठरल्यानंतर ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यावरील ३ हजार ८५१ विद्युत खांबांवर जाहिरात प्रदर्शन हक्क विकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासंदर्भातील टेंडर महापालिकेने प्रसिद्ध केले असून, २३ ऑगस्टपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. याद्वारे महापालिकेला वर्षाला अडीच कोटींचे उत्पन्न मिळणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते तसेच महामार्गांवर विद्युत खांब बसविण्यात आलेले आहेत. या खांबांवर आता जाहिरात प्रदर्शनाचे हक्क देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून या योजनेतून महापालिकेला महसूल मिळणार आहे. ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यावरील ३ हजार ८१५ विद्युत खांबांवर जाहिरात प्रदर्शन हक्क देण्याची योजना महापालिकेने तयार केली आहे. या योजनेनुसार ठेकेदाराला खांबांवर ४ बाय ६ आकाराचे जाहिरातीचे फलक उभारण्यास परवानगी दिली जाणार आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही योजना राबविली जाणार असून या योजनेतून महापालिकेला दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. या कामाचे टेंडर महापालिका प्रशासनाने प्रसिद्ध केले असून २३ ऑगस्टपर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यामुळे आता शहरातील विद्युत खांबांवरही जाहिराती झळकणार आहेत.

स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेने शहरात खासगी लोकसहभागातून शौचालये उभारणीचा निर्णय घेतला होता. संबंधित ठेकेदाराला जाहिरात हक्क देऊन त्याच्याकडून शौचालयांची बांधकामे करून घेतली जाणार होती. या योजनेत दोन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण ३० शौचालयांची उभारणी केली जाणार होती. घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग, बाळकुम, ठाणे शहर, कॅडबरी चौक, कळवा आणि मुंब्रा या भागांमध्ये ही शौचालये उभारणीचे नियोजन होते. या शौचालये उभारणीची कामे पूर्ण झालेली नसतानाही ठेकेदाराने जाहिरात फलक उभारून व्यवसाय सुरु केल्याचा प्रकार सुरुवातीला उघडकीस आला होता. प्रत्यक्षात ३० पैकी ११ शौचालयांची कामे पूर्ण झालेली असून त्यातही अनेक शौचालये बंदावस्थेत आहेत. त्यामुळे ही योजना वादग्रस्त ठरली असतानाच महापालिका प्रशासनाने आता विद्युत खांबांवर जाहिरात प्रदर्शन हक्क देण्याचा निर्णय घेतला आहे.