Tunnel Road Tendernama
मुंबई

Mega Tunnel Project: 2 समांतर बोगद्यांमुळे ठाणे-बोरिवली आता अवघ्या 15 मिनिटांत

मुंबई MMR मध्ये मोठा गेमचेंजर, घोडबंदर ट्रॅफिकला मोठा दिलासा; ठाणे–बोरिवली टनेलचे काम सुरू

टेंडरनामा ब्युरो

मुंबई : ठाणे–बोरिवलीदरम्यानचा 90 मिनिटांचा प्रवास आता अवघ्या 15 मिनिटांवर आणणाऱ्या महत्त्वाकांक्षी दुहेरी बोगदा प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. टीबीएम मशिन्सच्या लाँचिंगने या प्रकल्पाने निर्णायक टप्पा गाठला.

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाला गती मिळाली आहे. ठाणे बाजूकडून ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ या टनेल बोरिंग मशिन्सच्या साहाय्याने भुयारी मार्गाचे काम सुरू झाले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणारा हा प्रकल्प एकूण 11.84 किमी लांबीचा आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या या दोन समांतर बोगद्यांमुळे ठाणे आणि बोरिवली थेट जोडले जाणार आहेत.

या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वेळ आणि अंतरात होणारी मोठी बचत. सध्या 23 किमी अंतरासाठी लागणारा 90 मिनिटांचा प्रवास या बोगद्यामुळे केवळ 12 किमी आणि 15 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीचा ताण लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.

प्रकल्प पूर्णपणे भूमिगत असल्याने पर्यावरणीय परिणाम कमी ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सुमारे 11 हजार झाडांचे पुनर्लागवड करण्याचे नियोजन आहे. तसेच प्रत्येक 300 मीटरवर क्रॉस पॅसेज, आधुनिक अग्निसुरक्षा आणि व्हेंटिलेशन प्रणाली उभारण्यात येणार आहे.

हा बोगदा ठाणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण आणि नाशिक या प्रमुख कॉरिडॉर्सना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून शहरी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणार आहे.