Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

सी-लिंक टू पुणे सुपरफास्ट; 'इतक्या' कोटींचे टेंडर लवकरच

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई ते पुणे (Pune) प्रवास लवकरच आणखी वेगवान होणार आहे. वरळीहून निघाल्यावर शिवडी-न्हावाशेवा सी लिंक अर्थात सागरी सेतूवरून थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Express way) पोहोचता येणार आहे. यासाठी मुंबई पारबंदर प्रकल्प अर्थात शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू ९४७ कोटी २५ लाख खर्चून आता द्रुतगती महामार्गाशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही ९४७ कोटी २५ लाखांची कामे दोन टप्प्यात करण्यात येणार आहेत.

यातील पहिला टप्पा चिर्ले येथील आंतरबदल व सेवा रस्त्यावर ८५ कोटी ५० लाख खर्चाचा आहे. तर दुसऱ्या टप्प्यात मुंबई पारबंदर प्रकल्प थेट मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गास विविध कामे करून जोडण्यात येणार असून यावर ८६१ कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यात ३० हेक्टर जमीन भूसंपादनासाठीच्या १५० काेटी रुपयांचाही समावेश आहे. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे काम चार पॅकेजमध्ये सुरू असून १७,८४३ कोटींच्या खर्चास ३ जून २०१६ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पाचे काम जोमाने सुरू आहे.

पोरबंदर प्रकल्पाला चिर्ले येथून राज्य महामार्ग क्रमांक १०४ ला जोडण्यासाठी दीड किमीचा ३ बाय ३ मार्गिकेचा नवीन रस्ता तयार करणार. राज्य महामार्ग क्रमांक १०४ हा चिरनेर ते गवाणपाडा असा २ बाय २ मार्गिकेचा असून तो पुढे पनवेल नजिक राष्ट्रीय महामार्ग ३४८ ला जोडलेला आहे. तो आता ४ बाय ४ मार्गिकेचा करण्यात येणार आहे.

पोरबंदर प्रकल्पावरून ये-जा करणारी वाहतूक ही राष्ट्रीय महामार्ग ३४८ वरून राष्ट्रीय महामार्ग ४८ मार्गे पुढे अडीच किमी अंतरावर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर जोडली जाते. हे रस्ते सध्या २ बाय २ असून ते आता ४ बाय ४ मार्गिकेचे करण्यात येणार आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक या मार्गावर वळविण्यासाठी काेण येथे आंतरबदल बांधून वाहतूक विनाअडथळा सुसाट करण्यात येणार आहे. चिर्ले येथील आंतरबदलामध्ये चार लूप आणि सेवा रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. त्यानुसार पॅकेज ३ मध्ये दोन लुपच्या कामांचा समावेश आहे; मात्र वाहतूक सुरळीत होण्यासाठी उर्वरित दोन लूप आणि सेवा रस्ता बांधण्यात येणार आहे.