Charging Station
Charging Station Tendernama
मुंबई

'ST'च्या ई-बसेससाठी 175 डेपोत चार्जिंग स्टेशन्स

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या ताफ्यात ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्याची तयारी युद्धपातळीवर सुरु आहे. त्यानुसार, एसटीकडून बसेस भाडेतत्त्वावर घेण्याची टेंडर प्रक्रिया सुरू आहे. त्यापूर्वी राज्यात या बसेससाठी १७५ डेपो वा आगारात चार्जिंग केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.

'एसटी'कडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसला चार्ज करण्यासाठी डेपो वा आगारात उच्चदाबाची वीज जोडणी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाकडून राज्यभरातील सगळ्या विभाग नियंत्रकांना असे केंद्र उभारण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यात उच्चदाबाच्या वीज जोडणीसाठी विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना (इलेक्ट्रिकल) आवश्यक सूचना करायच्या आहेत. इलेक्ट्रिक बसेसचे परिचालन जास्त अपेक्षित असलेल्या भागातील चार्जिंग केंद्रावर जास्त चार्जिंग पाॅईंट तर कमी परिचालनाच्या ठिकाणी कमी चार्जिंग पाॅईंट अपेक्षित आहेत. चार्जिंग करताना अनुचित प्रकार घडू नये अशा जागा निवडून तेथे सुरक्षेची आवश्यक काळजीही घ्यायची आहे. चार्जिंग केंद्र होणार असल्याने आता लवकरच राज्यात इलेक्ट्रिक बस धावण्याचे संकेत आहेत.

राज्याच्या इलेक्ट्रिक बस धोरणानुसार एसटीने गेल्यावर्षी 1 जून रोजी एसटीच्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण केले आहे. पहिल्या टप्प्यात 150 'शिवाई' बसगाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. टेंडर प्रक्रियेद्वारे ई-मूव्हज कंपनीशी 50 व ऑलेक्ट्रा ग्रीनटेक (इवे ट्रान्स) कंपनीशी 100 बसगाड्यांचा भाडेकरार झाला आहे. यापैकी काही ई-बस ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. उर्वरित बसगाड्या लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ई-बस प्रदूषण विरहित, पर्यावरण पूरक, वातानुकुलित व आवाज विरहित आहेत. बसला आकर्षक रंगसंगतीमध्ये ‘शिवाई’ असे नाव देण्यात आले आहे. बस एकदा चार्ज केल्यानंतर २५० कि.मी. पर्यंत जाऊ शकते.

एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे. गेल्या वर्षात शासनाने २ हजार  ६०० कोटींची मदत केली. त्यापार्श्वभूमीवर ई-बसेस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. एसटीच्या टेंडरनुसार येत्या काही काळात तब्बल ५,१५० ई-बस नव्याने महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. १२ मीटर आणि ९ मीटर अशा दोन प्रकारात या बसगाड्या आहेत. महामंडळाने या बस पुरवठ्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. त्यापैकी १५० गाड्या चालू वर्षात तर उर्वरित ५००० गाड्या पुढील वर्षात पुरवठा करायच्या आहेत.

"एसटी महामंडळाकडून इलेक्ट्रिक बस भाडेतत्त्वावर घेण्याची टेंडर प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या बसेसला चार्ज करण्यासाठी राज्यातील १७५ डेपो वा आगार परिसरात चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहेत."
- शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक (वाहतूक), एसटी महामंडळ, मुंबई.