Mumbai Local
Mumbai Local Tendernama
मुंबई

मुंबईतील सर्वच लोकल AC करण्याच्या दिशेने रेल्वेचे ऐतिहासिक पाऊल...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वे सेवेचा (Mumbai Local Train) चेहरा मोहरा बदण्यासाठी रेल्वेकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईकरांचा लोकल प्रवास आनंददारी व्हावा म्हणून अनेक निर्णय घेतले आहेत. मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवेसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वच लोकल वातानुकूलित करण्याबाबत विचार सुरू आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून रेल्वेकडून २३८ नव्या रेल्वे गाड्यांची खरेदी करण्यात येणार असून, त्या सर्वच्या सर्व गाड्या वातानुकूलित असणार आहेत. त्यामुळे संपूर्ण लोकल सेवा वातानुकूलित असावी हे सामान्य मुंबईकरांचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुढे मुंबईतील उपनगरी सेवेसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या या वातानुकूलितच असतील असा निर्णय मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये रेल्वे मंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीतच घेण्यात आला होता.

मुंबईकरांचा प्रवास आता आणखी गारेगार होणार आहे. एमयूटीपी-3 (MUTP-3) मध्ये 47 आणि 3 (अ) मधील 191 अशा 238 वातानुकूलित लोकल रेल्वेसाठी एमआरव्हीसी (MRVC) लवकरच ग्लोबल टेंडर (Global Tender) काढणार आहे.

नवीन वातानुकूलित लोकल रेल्वे सुसज्य आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम असेल. या एसी लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी टॉकबॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही तर असतीलच शिवाय इतरही काही नवीन फिचर्स असणार आहेत. त्यामुळे या नवीन 47 वातानुकूल रेल्वे लोकल मुंबईकरांसाठी पर्वणी ठरणार आहेत.

या वातानुकूलित लोकलला प्रथमच मुंबईचे डब्बेवाले तसेच मच्छी विक्रेते यांच्यासाठी स्वतंत्र मालडबा जोडला जाणार आहे. या डब्यातून इतर डब्यात मच्छीचा वास पसरू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. हे मालडबे एसी लोकलच्या दोन्ही कडेला म्हणजे एका बाजूला असणार असून, या डब्यातील पदार्थांचा वास इतर डब्यांत जाऊ नये यासाठी मालडब्याला स्वतंत्र एसी यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता यांनी दिली आहे.

येत्या काळात मुंबईतील सर्वच लोकल एसी करण्याचा केंद्र सरकार विचार आहे. सुखकर प्रवास प्रकल्प या योजनेला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. हा प्रकल्प २० हजार कोटींचा असून, याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे मंजुरीकरता पाठवण्यात आला आहे. अर्थखात्याकडून मंजुरी मिळताच टेंडर मागवण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास मुंबईकरांना गारेगार प्रवास करता येणार आहे.

मुंबईसह ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका येत्या काहीच दिवसांत आहेत. या महापालिकांतर्गत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विविध प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या अंतर्गत एसी लोकल सुरू करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.