Railway
Railway Tendernama
मुंबई

Mumbai : हार्बर रेल्वेचा 'या' स्टेशनपर्यंत होणार विस्तार; पुढील महिन्यात 825 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पश्चिम रेल्वेने बोरिवलीपर्यंत २ टप्प्यांत हार्बर मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाकरिता पुढील महिन्यात टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ८२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोरेगावपर्यंत हार्बर सेवा आहे. गोरेगाव ते मालाड पहिला टप्पा २०२६-२७ आणि मालाड ते बोरिवली दुसरा टप्पा २०२७-२८पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मे महिन्यात टेंडर काढून जूनच्या आधी प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे. यामुळे भविष्यात या मार्गावर वातानुकूलित लोकल चालवणेही शक्य होणार आहे. बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचे प्राथमिक काम पूर्ण झाले आहे. यात भू-तांत्रिक तपासणी, सर्वेक्षण, बाधित बांधकामे व झाडांचे ड्रोन सर्वेक्षण यांचा समावेश आहे.

गेल्या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या बोरिवली ते विरारदरम्यान वाढली आहे. यामुळे हार्बर विस्तारीकरण जलदगतीने पूर्ण करण्यासाठी गोरेगाव ते मालाड (२ किमी) आणि मालाड ते बोरिवली (६ किमी) असा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोरिवलीपर्यंत पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे असे दोन पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध होतील.