मुंबई (Mumbai) : पश्चिम रेल्वेच्या सर्व प्रवासी आणि मालगाड्यांच्या इलेक्ट्रिक आणि डिझेल इंजिनमध्ये हाय डेफिनेशन कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेऱ्यांचे बजेट सुमारे १०० कोटी रुपये आहे. यासाठी लवकरच टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.
९७८ रेल्वे इंजिनवर ६,००० कॅमेरे बसवले जाणार आहेत. हे कॅमेरे ३६० अंशाच्या कोनातून प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतील, जे ट्रॅकपासून इंजिनच्या आतपर्यंतच्या हालचाली रेकॉर्ड करतील. मार्च २०२६ पर्यंत सर्व प्रवासी आणि मालगाडीच्या इंजिनमध्ये हे कॅमेरे बसवले जातील. पश्चिम रेल्वेकडे ८१० इलेक्ट्रिक आणि १६८ डिझेल इंजिन आहेत. या इंजिनमध्ये दोन ड्रायव्हिंग कॅब आहेत. दोन्ही कॅबमध्ये एक कॅमेरा बसवला जाईल. याशिवाय, इंजिनच्या बाहेर चारही दिशांना चार कॅमेरे बसवले जातील. एका इंजिनमध्ये ६ सीसीटीव्ही कॅमेरे असतील. प्रत्येक इंजिनमध्ये सीसीटीव्ही देखरेख प्रणाली बसवली जाईल. हे कॅमेरे हाय डेफिनेशन आणि हाय रिझोल्यूशनचे असतील, जे ३६० अंशातील क्रियाकलाप कॅप्चर करण्यास सक्षम असतील. यामुळे ट्रॅक, रेल्वे क्रॉसिंग आणि आजूबाजूच्या प्रत्येक हालचालीचे रेकॉर्डिंग शक्य होईल. अपघाताची कारणे शोधण्यात ही प्रणाली उपयुक्त ठरेल. हे रेकॉर्डिंग पूर्णपणे ऑफलाइन मोडमध्ये असेल, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे हॅकिंग होणार नाही. अशी अपेक्षा आहे की यामुळे प्रवाशांची सुरक्षितता मजबूत होईल आणि कोणत्याही अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीच्या तपासात महत्त्वाचे इनपुट मिळतील.
त्याचबरोबर मुंबई उपनगरीय रेल्वेतून दररोज सुमारे ५० हजार ज्येष्ठ नागरिक प्रवास करतात. परंतु, त्यांच्यासाठी एका लोकलमध्ये केवळ १४ आरक्षित आसने उपलब्ध करण्यात आली असून गर्दीच्या वेळी या आसनापर्यंत पोहचणे ज्येष्ठ नागरिकांना अशक्य होते. ही बाब लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकलच्या एका मालडब्याचे रुपांतर ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील १०५ लोकलमधील प्रत्येकी एका मालडब्यात बदल करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ५.४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून हे बदल एका वर्षाच्या आत करण्याचा संकल्प पश्चिम रेल्वेने सोडला आहे. गेल्या काही वर्षांपासून लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. काही वेळा प्रवासादरम्यान विविध कारणांमुळे प्रवाशांचा मृत्यू होतो. गर्दीमुळे प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश करता येत नाही. गर्दीच्या लोंढ्यामुळे अनेकांचा श्वास गुदमरतो. ज्येष्ठ नागरिकांना लोकलमधून प्रवास करणे अत्यंत कठीण होत आहे.