Railway Station
Railway Station Tendernama
मुंबई

दिवाळीनंतर 'या' ४ रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटणार; १२५ कोटींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 'एमयूटीपी 3 अ' अंतर्गत कांदिवली, मीरा रोड, कसारा आणि नेरळ या चार रेल्वे स्थानकांवर सुधारणेचे काम हाती घेतले आहे. कांदिवली आणि मीरा रोड या २ स्थानकांसाठी सुमारे १२५ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

स्थानक सुधारणांमध्ये प्रशस्त डेक, पूर्व-पश्चिम जोडणारे पूल, प्रवासी मागणीनुसार तिकीट खिडक्या, अन्य प्रवाशी सुविधा, सुनियोजित प्रवेश निर्गम या सुविधांचा समावेश आहे. बोरिवली स्थानकाच्या धर्तीवर या सुधारणा असणार आहेत. कांदिवली स्थानकाच्या पश्चिम दिशेला १०.३ मीटर रुंदीचा प्रशस्त डेक उभारण्यात येईल. सर्व पादचारी पुलांची याला जोडणी असेल. यासाठी उत्तर दिशेकडील ६ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाचा आणि मध्यभागी असलेल्या ४ मीटर रुंदीच्या पुलाचा विस्तार होणार आहे. मीरा रोड स्थानकात ११ मीटर रुंदीचा डेक उभारण्यात येणार आहे. सध्याचे तिकीटघर, आरक्षण कार्यालय, रेल्वे कार्यालय अन्यत्र हलविले जाणार आहेत.

१० मीटर रुंदीच्या पुलाला स्कायवॉकची जोडणी देण्यात येईल. या दोन्ही स्थानकांसाठी १२५ कोटी रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे. एमयूटीपी ३ अ' या प्रकल्प संचातील स्थानक सुधारणा या प्रकल्पात १९ रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. मार्च २०१९मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला. कोविडमुळे हा प्रकल्प मागे पडला होता. स्थानक सुधारणेतील चार स्थानकांच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याने रेल्वे स्थानकांचे रुपडे बदलण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प लवकरच आकार घेणार आहे. यासंदर्भात मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद गुप्ता म्हणाले, एमयूटीपी ३ अ स्थानक सुधारणा प्रकल्पातील चार स्थानकांचे काम दिवाळीनंतर सुरु होईल. ३६ महिन्यांत चारही स्थानकांतील कामे पूर्ण होतील. मात्र, काही सुविधा १८ महिन्यांतच प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.