Local Train
Local Train Tendernama
मुंबई

Mumbai : 'या' ठिकाणी होणार नवे कारशेड; 2,352 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : उपनगरीय लोकल रेल्वे गाड्यांच्या देखभालीसाठी आगामी काळात दोन कारशेड उभारणीचे काम मुंबई रेल्वे विकास महामंडळाने प्रस्तावित केले आहे. पश्चिम रेल्वेचे वाणगाव येथे, तर मध्य रेल्वेचे भिवपुरी येथे कारशेड उभारले जाणार आहे. या दोन्ही कारशेडसाठी सुमारे २३५२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे नियोजन आहे.

मुंबई उपनगरीय लोकल रेल्वेच्या देखभालीसाठी ६ कारशेड आहेत. मध्य रेल्वेचे कुर्ला, सानपाडा व कळवा येथे कारशेड आहे तर पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल, कांदिवली व विरार येथे कारशेड आहे. दररोज या कारशेडमध्ये २५० लोकल ट्रेन निरीक्षण व देखभालीसाठी येतात-जातात. आता यामध्ये आणखी २ कारशेडची भर पडणार आहे. सध्या या दोन्ही कारशेडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे. दोन्ही नवीन कारशेड ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असणार आहेत. याठिकाणी लोकल रेल्वेच्या निरीक्षणासाठी सेन्सर्स लावले जाणार आहेत. तसेच दैनंदिन ६५ ट्रेनची देखभाल करता येईल, अशी व्यवस्था या कारशेडमध्ये केली जाणार आहे.

प्रस्तावित नवीन कारशेडपैकी भिवपुरी कारशेडचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. यासाठी ५४.५६ हेक्टर खासगी जागा, तर ३.१६ हेक्टर शासकीय जमीन लागणार आहे. रेल्वेने या जागेच्या मागणीसंदर्भात रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे. याबाबतची राजपत्रात अधिसूचना सुद्धा प्रसिद्ध झाली आहे. शासकीय जागेसाठी ५.८५ कोटी रुपये भरावे लागणार आहेत. त्यापैकी ३ कोटी रुपये रेल्वेने आगाऊ जमा केले आहेत. वाणगाव कारशेडचा प्रकल्प सर्व्हे सुद्धा पूर्ण झाला आहे. याबाबतीत भूसंपादनासाठी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष रेल्वे प्रकल्प, सक्षम प्राधिकरण व भूसंपादन अधिकाऱ्याने राजपत्रात यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.