Railway
Railway Tendernama
मुंबई

Mumbai : पनवेल-कर्जत रेल्वेचे काम मिशन मोडवर; बोगद्यासाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) (MRVC) पनवेल-कर्जत नवीन उपनगरी मार्गाचे काम वेगाने सुरू केले आहे. या मार्गावरील 3.12 किमी लांबीच्या बोगद्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुमारे २,८०० कोटींचे बजेट असलेल्या या संपूर्ण प्रकल्पाचे मार्च 2025 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

कर्जत आणि पनवेलला जोडणाऱ्या या 30 किमी लांबीच्या उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या कामाला आता जोरदार सुरुवात झाली आहे. एमआरव्हीसीने गुरुवारी 2.6 किमी लांबीच्या बोगद्यासाठी ब्लास्टिंग क्रिया पार पाडली. पनवेल-कर्जत हा डोंगरांमधून जाणारा सर्वात लांब मार्ग आहे. या मार्गामुळे सीएसएमटी ते कर्जत दरम्यानचा प्रवासाचा वेळ 20 मिनिटांनी कमी होणार आहे. या दुहेरी मार्गावर एकूण तीन बोगदे आणि दोन रेल्वे ओव्हरब्रिज असतील जे मुंबई महानगर प्रदेशातील रायगड आणि नवी मुंबई यांना जोडतात. 3.12 किमी लांबीच्या या बोगद्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू आहे. या मार्गावरील एका बोगद्यासाठी खोदकामही सुरू झाले आहे. मध्य रेल्वेच्या पारसिक बोगद्याच्या तुलनेत हा बोगदा दुपटीने लांब आहे.

याबद्दल एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद गुप्ता म्हणाले की, हा दुहेरी मार्ग मुंबई ते कर्जत मार्गे पनवेल असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देईल. कल्याणमार्गे कर्जतला जाण्याच्या तुलनेत या मार्गावरून वेळेची बचत होणार आहे. या मार्गामुळे पनवेल-कर्जत या नव्या शहरांचा वेगवान विकास होईल. तसेच या शहरांच्या आर्थिक विकासासाठी हा मार्ग महत्वाचा ठरेल.

या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी वावर्ले हा बोगदा 2600 मीटर लांबीचा आहे. नढालची लांबी 219 मीटर आणि किरवलीची लांबी 300 मीटर आहे. या बोगद्याव्यतिरिक्त दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून कर्जतजवळील उड्डाणपूल 1,225 मीटर आणि पनवेललगतचा पूल 1,375 मीटरचा आहे. मार्च 2025 पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणे नियोजित आहे.

पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वेमार्ग
- खर्च - 2,782 कोटी
- स्थानके - 5 (पनवेल, चिखले, मोहपे, चौक, कर्जत )
- रेल्वे मार्गिकांची एकूण लांबी - 30 किमी
- उड्डाणपूल - 2
- बोगदे - 3
- पूल - 44 ( 8 मोठे पूल, 36 लहान पूल)
- आरओबी/आरयूबी - 5 रोड ओव्हरब्रिज, 15 रोड अंडरब्रिज, रुळ ओलांडणीसाठी एक पादचारी पूल