Olectra
Olectra Tendernama
मुंबई

मुंबई, पुणे पाठोपाठ 'या' शहरातही धावणार ऑलेक्ट्राच्या इलेक्टिक बस

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पुणे, मुंबई, नवी मुंबई पाठोपाठ आता ठाण्यात देखील ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या इलेक्टिक बसेस धावताना दिसणार आहेत. सुमारे १८५ कोटींचे हे टेंडर आहे. एकूण १२३  इलेक्ट्रिक बसेस ठाण्यात दाखल होणार आहेत.

कार्बन डायऑक्साईडमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची मागणी सध्या सर्वत्र वाढते आहे. पुण्यात जवळ जवळ 400 हून अधिक ई बसेस रस्त्यावर धावत आहेत. मुंबईत देखील 2017 पासून साध्या आणि वातानुकूलित बसेस रस्त्यावर धावताना दिसत आहेत. बेस्ट बसेसच्या ताफ्यातील ई बसेसची संख्या देखील ४०० हून अधिक आहे शिवाय डबल डेकर बसेस देखील प्रतीक्षेत आहेत. नवी मुंबईत देखील इलेक्ट्रिक बसेस वाहतूक सेवेत आहेत.

पहिल्या टप्यात १२ मीटरच्या मोठ्या तसेच ९ मीटरच्या मीडी अशा दोन प्रकारच्या बसेसची मागणी टीएमटीने ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडे नोंदवली आहे. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि इवे ट्रान्स या अनुक्रमे उत्पादक आणि परिचालन करणाऱ्या कंपन्यांमार्फत बसेस चालवल्या जाणार आहेत. एकूण १२३  इलेक्ट्रिक बसेसचे मागणीपत्र देण्यात आले आहे. यातील काही बसेस वातानूकुलित तर काही साध्या अशा प्रकारात आहेत. अतिशय प्रगत सुविधांनी या बसेस सज्ज असणार आहेत. प्रवाशांच्या सुखसोयीसाठी १२ मीटर आणि ९ मीटर लांबीच्या या बसेसमध्ये उत्तम एअर सस्पेंशन आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स अशा सुविधा असणार आहेत. 9 महिन्यांच्या कालावधीत या बसेसचे वितरण होईल. हा करार १५ वर्षासाठी करण्यात येणार आहे. सुमारे १८५ कोटी या टेंडरची किंमत आहे. यात १२ मीटरच्या एकूण 55 बसेस आहेत त्यापैकी ४५ एसी तर १० विना वातानुकूलित आहेत. 9 मीटरच्या एकूण 68 बसेस आहेत यापैकी 26 एसी तर 42 नॉनएसी प्रकारच्या बसेस या करारानुसार टीमटीला मिळणार आहेत.