Sharad Pawar
Sharad Pawar Tendernama
मुंबई

रेती, खडी पुरवठा 'मोनोपॉली'चे 'ते' प्रकरण; शरद पवारांकडे तक्रार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबईतील प्रामुख्याने पनवेल महसूल क्षेत्रातील दगड खाणी आणि क्रशरच्या उत्पादनांवर वर्चस्व राखणाऱ्या 'स्वराज' कंपनीबाबतच्या तक्रारींची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली. त्यांनी गुरुवारी रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना फोन करून सूचना केल्या.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील दालनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील आणि पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू तसेच २७ गाव प्रकल्पग्रस्त संघटनेचे प्रतिनिधी सचिन केणी यांनी भेट घेतली. महसूल यंत्रणेला हाताशी धरून राज्य मंत्रिमंडळातील काही जण आणि त्यांचे नातेवाईक क्रशर मालक, दगडखाण चालक यांच्या व्यवसायावर टाच आणत असल्याचे प्रशांत पाटील, कांतीलाल कडू आणि सचिन केणी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पवार यांनी रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना फोन केला. काहींच्या दगडखाणी आणि क्रशर सुरु आहेत आणि काहींच्या जबरदस्तीने बंद केल्या जात आहेत. तिकडे 'स्वराज' नावाची कंपनी स्थानिक शेतकरी व प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करीत असल्याची तक्रार आपल्याकडे आली असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

यासंदर्भात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच मोठा आरोप केला होता. मुंबईतील रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक असणारा खडीपुरवठा तब्बल दोन आठवडे बंद राहिल्याने रस्ते, पुलांच्या कामांना ब्रेक लागला. रेती, खडी विकायचे काम एकाच कंपनीला देण्यात आले असून हीच कंपनी कंत्राटदारांना विकणार आहे. यामुळे पूर्वी जी खडी 300 रुपये प्रति टन मिळत होती ती आता साडेचारशे ते साडेसहाशे रुपये प्रति टन मिळायला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्तुळातील जवळच्या माणसाला खडीपुरवठ्याचे काम देण्यासाठीच हा प्रकार सुरू असून मुंबईला वेठीला धरण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. खडीचा घोळ काय आहे? एका कंपनीलाच खडीविक्रीचे काम द्या असे आदेश दिल्याचे खरे आहे की नाही? असे प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घ्यावी, श्वेतपत्रिका काढावी आणि जनतेला सांगावे की कोणत्या शहरांमध्ये 2 आठवडे रस्ते आणि पुलाची कामे खडीपुरवठा थांबल्याने बंद आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटले की, सर्वच दगडखाणी मालक व क्रशर चालकांना पर्यावरण विभागाकडून एकाच विशिष्ट कंपनीकडून खडी घ्यावी अशी सक्ती केली जात आहे. रेती खडी विकायचे काम एकाच कंपनीला देण्यात आले असून हीच कंपनी कंत्राटदारांना खडी विकणार आहे. यामुळे पूर्वी जी खडी 300 रुपये प्रति टन मिळत होती ती आता साडेचारशे साडेसहाशे प्रति टन मिळायला लागली आहे. कच्चा मालाचे दर वाढल्याने आणि रस्ते तसेच पुलांच्या कामांना विलंब होत असल्याने या प्रकल्पांच्या किंमती वाढायला लागल्या आहेत. असे असतानाही एका विशिष्ट कंपनीला खडीपुरवठ्याचे काम देणे म्हणजे एक नवा टॅक्स लावण्याप्रमाणेच असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे सांगणाऱ्या भाजप प्रत्येक गोष्टीत घोळ घालणाऱ्या, घोटाळे करणाऱ्या या सरकारला इतका पाठिंबा का देतंय? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे. पावसाळापूर्व कामे 31 मेपूर्वी पूर्ण करण्यासाठी विविध स्तरांवर योग्य कार्यवाही करण्यात येत असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणारी नालेसफाई आणि रस्त्यांची कामेही योग्य प्रमाणात सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे, मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून खडीपुरवठा बंद असल्याने अनेक रस्ते, पुलांची कामे बंद असल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले होते. यामुळे पावसाळा अवघा दीड महिन्यावर आला असताना पावसाळ्याआधी 31 मेपूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत तर पावसाळ्यात मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले होते.