मुंबई (Mumbai) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे एकेक पाऊल पुढे पडते आहे. बांधकामाचा एकामागोमाग टप्पा पूर्ण करत असलेले हे विमानतळ पुढील वर्षाच्या पूर्वार्धात सुरु होईल असा दावा केला जात आहे.
अदानी समूहाचे सीएफओ, जुगशिंदर रॉबी सिंग यांनी नुकतेच नवी मुंबई येथे अदानी समूहामार्फत नव्याने बांधण्यात येत असलेले विमानतळ सन 2025 च्या पूर्वार्धात सुरू होईल, असा अंदाज वर्तवला आहे. ऑक्टोबरच्या सुरुवातीला अदानी समूहाने नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाच्या विमानांचे यशस्वीरित्या लँडिंग केले आहे. सिंग यांनी अदानी फ्लॅगशिप कंपनीच्या तिमाही आणि सहामाही निकालांची घोषणा करताना सांगितले की, ते पुढील वर्षी, 2025 च्या पहिल्या सहामाहीत विमानतळाचे ऑपरेशन सुरू करण्याच्या मार्गावर आहेत. सिंग यांनी पुढे सांगितले की, कंपनी सर्व सात ऑपरेशनल विमानतळांवर सहा नवीन मार्ग, सहा नवीन एअरलाईन्स आणि 13 नवीन उड्डाणे जोडण्यात यशस्वी झाली आहे. नवी मुंबई विमानतळावर मोठी व्यावसायिक विमाने, आधुनिक प्रवासी टर्मिनल आणि प्रगत हवाई वाहतूक नियंत्रण प्रणाली हाताळण्यास सक्षम असलेली 3,700 मीटरची धावपट्टी असेल. या विमानतळाचे टर्मिनल 1 दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी हाताळेल असा अंदाज आहे.
विमानतळ पूर्ण झाल्यावर, याठिकाणी प्रति वर्षी 90 दशलक्ष प्रवासी हाताळण्याची एकूण क्षमता असेल. याआधी 2019 मध्ये अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची 100 टक्के उपकंपनी म्हणून अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचा समावेश करण्यात आला. अदानी समूह सहा विमानतळांचे ऑपरेशन, व्यवस्थापन आणि विकास यासाठी सर्वाधिक बोली लावणारा म्हणून उदयास आला होता. यामध्ये अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरम यांचा समावेश आहे.
अदानी विमानतळ कंपनी आता 25 टक्के प्रवासी आणि भारतातील 33 टक्के हवाई मालवाहतूक हाताळते. अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 664 टक्क्यांनी वाढून 1,741 कोटी रुपये झाला आहे. 2023 मध्ये तो 228 कोटी रुपये होता. आतापर्यंत 2024-25 च्या दोन तिमाहींमध्ये- एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबरमध्ये एकूण नफा 254 टक्क्यांनी वाढून 3,196 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत त्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ होऊन तो 23,196 रुपये झाला. एप्रिल-जून आणि जुलै-सप्टेंबर मिळून एकूण उत्पन्न 14 टक्क्यांनी वाढून 49,263 कोटी रुपये होते.