Powai Lake
Powai Lake Tendernama
मुंबई

BMC पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखणार; DPR साठी ६८ लाखांचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : राष्ट्रीय हरीत लवादाने फटकारल्यानंतर समुद्रात आणि तलावांमध्ये जाणारे दूषित पाणी रोखण्यासाठी मुबंई महापालिकेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शीतल तलावानंतर आता मुंबईतील पवई तलावात जाणारे सांडपाणी रोखण्याचा निर्णय महापालिकेने घेण्यात आला आहे. पवई तलावात सोडण्यात आलेले सांडपाणी बंद करून ते गटारात सोडण्यात येणार आहे. त्यासाठी मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे एकत्रित करण्यात येणार आहे. या कामी सल्लागाराकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका ६७ लाख ८० हजार रुपये खर्च करणार आहे. प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

पश्चिम व पूर्व उपनगराच्या मध्यावर असलेल्या पवई तलावाचे बांधकाम १८९० मध्ये करण्यात आले आहे. तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.६१ किमी आहे. पण तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने औद्योगिक वापरासाठी त्याचा वापर केला जातो. तलाव परिसरात झोपडपट्ट्या असून तेथील सांडपाण्यासह औद्योगिक कारखान्यातील सांडपाणी तलावात सोडण्यात येते. त्यामुळे तलावातील प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. प्रदुषणाबाबत महापालिका उपाययोजना करत नसल्याने राष्ट्रीय हरीत लवादाने महापालिकेला वेळोवेळी फटकारले आहे. या प्रकरणी वनशक्ती व अन्य संस्थांनी महापालिकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

१२ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने प्रदूषण थांबवण्याचे आदेश देत तज्ज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमओईएफ, पर्यावरण विभाग, प्रादेशिक अधिकारी यांचा समावेश आहे. पवई तलावात सोडण्यात आलेले सांडपाणी बंद करून ते गटारात सोडण्यात येणार आहे. त्यासाठी मलनिःसारण वाहिन्यांचे जाळे एकत्रित करण्यात येणार आहे. या कामी सल्लागाराकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालासाठी महापालिका ६७ लाख ८० हजार रुपये खर्च करणार आहे. प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती महापालिकेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.