SIAC
SIAC Tendernama
मुंबई

Mumbai : शेकडो IAS अधिकारी निर्माण करणाऱ्या संस्थेच्या जागेवर कोणाचा आहे डोळा?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भारतीय प्रशासन सेवेत राज्यातून शेकडो अधिकारी घडवणारी संस्था अशी ओळख असलेली छत्रपती शिवाजी महाराज स्थानकासमोरील राज्य प्रशिक्षण व्यवसाय शिक्षण संस्थेचे (SIAC) इतरत्र स्थलांतर करण्याची तयारी सुरू असून, या मोक्याच्या जागेचा खासगीकरणातून पुनर्विकास करण्याचा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) घातला आहे.

यावर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थलांतराचा सध्या फक्त प्रस्ताव ठेवला आहे अजून अंतिम मान्यता मिळाली नसल्याची माहिती दिली.

राज्य प्रशिक्षण व्यवसाय शिक्षण संस्थेच्या जागेवरील सर्व इमारती पाडून त्याठिकाणी नवीन वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकानुसार (एफएसआय) या जागेचा खासगीकरणांतर्गत पुनर्विकास करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या संस्थेचे कार्यालय स्थलांतरित करावे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाने या संस्थेला पत्राद्वारे कळवले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या या जागेचा ‘बांधा, वापरा आणि हस्तांतर करा’ या तत्त्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. मात्र अजून कोणत्याही प्रस्तावास अंतिम मंजुरी मिळाली नाही. आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने मंजुरी मिळण्यास किती दिवस लागतील माहीत नाही.

- रणजित हांडे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई

कोणतीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘एसआयएसी’ला पत्र पाठवून ही संस्था इतरत्र स्थलांतरित करण्याचे फर्मान काढले आहे. सध्या २०२४ या वर्षासाठी १२० विद्यार्थ्यांना येथे मार्गदर्शन करण्यात येत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला इतकी घाई झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- तेजस चांदोरकर, निमंत्रक, एसआयएसी, मुंबई बचाव संघर्ष समिती