मुंबई (Mumbai) : गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या उपक्रमास ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता दिली केली.
नव्या इमारतीत तळमजला व तीन मजले असा आराखडा असून, सुमारे १०,२१० चौ. मीटर पृष्ठभागातील या रुग्णालयात लहान-मोठ्या प्राण्यांसाठी अत्याधुनिक व बहुविध सेवांचा समावेश आहे.
उपनगरातील व मुंबईतील विविध भागातील प्राण्यांच्या उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना ही सुविधा मोलाची ठरणार आहे. या प्रकल्पात वास्तुविशारदांची मान्यता, सौरऊर्जा प्रणालीची उभारणी व पर्यावरणपूरक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे पशुप्रेमी, शेतकरी, रहिवासी व मुंबई महानगरातील नागरिकांची जुनी मागणी पूर्ण होत आहे. नव्या मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे प्राण्यांच्या आरोग्यसेवेतील दर्जा आणि उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, पालकमंत्री ॲड. शेलार यांनी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे.
उपनगरातील पाळीव आणि निसर्ग मुक्त पशूंसाठी उत्कृष्ट उपचार व सेवांची सुविधा उभारली जाईल, असे प्रतिपादन उपनगर पालकमंत्री ॲड. शेलार यांनी केले आहे.