मुंबई (Mumbai): राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
कोकण-गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी तसेच कोकण-गोदावरी वळण योजना या नदीजोड प्रकल्पांचा सविस्तर आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला.
मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेताना मंत्री विखे पाटील यांनी कामांची गती वाढवून प्रत्येक टप्प्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरविण्याचे निर्देश दिले. राज्याच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापनासाठी तसेच दुष्काळग्रस्त भागांना दिलासा देण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात प्रस्तावित हा प्रकल्प दमणगंगा आणि वैतरणा उपखोऱ्यातील अतिरिक्त उपलब्ध पाणी उर्ध्व गोदावरी उपखोऱ्यात वळविण्यासाठी राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील अवर्षणप्रवण सिन्नर तालुक्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून घरगुती वापरासाठी, तसेच दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरीडोरसाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच गोदावरी नदीत पाणी सोडल्यामुळे मराठवाड्यातील प्रकल्पाच्या लाभक्षेत्रालाही मोठा दिलासा मिळणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
प्रकल्पांतर्गत निलमाती, मेट, कोशिमशेत, उधळे आणि बोरखिंड अशी पाच धरणे प्रस्तावित आहेत. यापैकी उधळे आणि मेट धरणांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून कोशिमशेत, निलमाती आणि बोरखिंड धरणांच्या मोजणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.
कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना गती द्या
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थितीवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्यासाठी प्रस्तावित कृष्णा-भीमा पूर वळण योजनांना व्यापक जनहित लक्षात घेऊन या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मंत्री विखे-पाटील यांनी दिले.
कृष्णा उपखोऱ्यातील पुराचे पाणी भीमा उपखोऱ्यात वळविण्याच्या प्रस्तावावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पूरनियंत्रणासोबतच दुष्काळी भागांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या योजनेचे महत्त्व असाधारण असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या वाट्याच्या पाण्याचा प्रभावी वापर, सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या कामांचाही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी आढावा घेतला. प्रकल्पासाठी आवश्यक तांत्रिक बाबी, प्रशासकीय मान्यता आणि पुढील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री विखे पाटील यांनी केल्या. बैठकीस जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.