BMC
BMC Tendernama
मुंबई

मुंबईकरांचे ६० कोटी खड्ड्यात; निकृष्ट कामांमुळे खर्च वाया

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामांवर ५० - ६० कोटींचा केलेला खर्च निकृष्ट कामांमुळे वाया गेला आहे. तसेच, या कोट्यवधी रुपयांच्या खर्चात मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असा गंभीर आरोप मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रवी राजा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुंबईत डांबरी व सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामांसाठी मुंबई महापालिकेच्या सन २०२० - २१ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. रस्त्यांची कामे अर्धवट झाली. तसेच, रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यांवर ठिकठिकाणी शेकडो खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. अनेक मुंबईकरांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबत पालिकेकडे अनेकदा तक्रारी दिल्या. मात्र पालिका प्रशासन खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करण्यात व खड्डे बुजविण्याच्या कामात सपशेल निष्फळ ठरले, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे. मुंबईत विघ्नहर्ता श्रीगणेशाचे मोठ्या धुमधडाक्यात व वाजतगाजत आगमन व विसर्जन झाले मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश देऊनही रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजविण्यात व खड्ड्यांची कामे चांगल्या दर्जाची करण्यात पालिकेला अपयश आले आहे. आजही खड्ड्यांची समस्या कायम आहे, अशी टीका करीत रवी राजा यांनी पालिका प्रशासनावर तोफ डागली.

आता नवरात्री उत्सव तोंडावर आला आहे. तरी खड्डे अद्यापही बुजविण्यात आलेले नाहीत. वास्तविक, खड्डे बुजविण्याच्या कामांवर यंदा ५०-६० कोटींचा खर्च करण्यात येऊनही खड्ड्यांची समस्या नागरिकांना आजही भेडसावत आहे. त्यामुळे खड्ड्यांवरील कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे. तसेच, या खड्डे बुजविण्याच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांत मोठा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रवी राजा यांनी केली आहे. नवरात्री, दसरा सणानंतर सर्वांचा लाडका व आनंददायी सण दिवाळी येणार आहे. या दिवाळी सणाला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबईतील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.