Coastal Road
Coastal Road Tendernama
मुंबई

Mumbai : कोस्टल रोड 100 टक्के मजबूत; अशी झाली यशस्वी परीक्षा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी सागरी मार्गाचे 85 टक्के काम पूर्ण झाल्याने या मार्गाच्या एका लेनचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी कोस्टल रोड मजबुतीच्या परीक्षेतही पास झाला आहे. कोस्टल रोडवर हाजीअलीजवळील ब्रीजवर तब्बल तीनशे टनांचे बारा ट्रक सलग 72 तास उभे करून ब्रीज-मार्गाची यशस्वी परीक्षा घेण्यात आली.

सागरी मार्ग प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा 10.58 किमीचा मार्ग बांधण्यात आला आहे. कोस्टल रोडचे पुढील आठवड्यात लोकार्पण करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. कोस्टल रोड लोकार्पणाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी 8 ते रात्री 8 असा केवळ बारा तास सुरू राहणार आहे. उरलेल्या वेळेत कोस्टल रोडचा उत्तरेकडील मार्ग पूर्ण करण्याचे काम आणि कोस्टल रोडला वरळी आणि शिवडी सागरी सेतू जोडण्याचे काम करण्यात येणार आहे. संपूर्ण कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने 15 मेपासून सुरू करणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे.

हाजीअलीजवळील दोन लेनच्या आणि 1.2 किमीच्या चार लेनच्या कोस्टल रोडवरील सर्वात जास्त लांबीच्या ब्रिजवर समान वजनाचे एकूण तीनशे टनांचे १२ ट्रक ठेवण्यात आले. यामध्ये सुरुवातीला 25 टक्के, यानंतर 50 टक्के आणि यानंतर 100 टक्के असे वजन वाढवून 300 टनांचे बारा ट्रक शनिवार, रविवार आणि सोमवार असे 72 तास ठेवण्यात आले. यानंतर 25 टक्के, 50 टक्के आणि यानंतर 100 टक्के वजन घटवण्यात आले. ही टेस्टिंग यशस्वी ठरली. या ट्रकमध्ये लोखंड, मोठ्या दगडांनी वजन वाढवण्यात आले होते. मजबुतीची ही परीक्षा 100 टक्के यशस्वी ठरली आहे. कोस्टल रोडच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर मार्गावर दिशादर्शक फलक लावणे, लाईटचे काम, मार्गावर आवश्यक मार्किंग करणे अशी कामे केली जात आहेत. या मार्गावरील इंटरचेंजवर वेगमर्यादा 40 किमी प्रतितास, तर मेन रोडवर 80 किमी प्रतितास राहणार आहे. या मार्गावर हेवीवेट वाहनांना बंदी राहील.