Slum

 

Tendernama

मुंबई

झोपड्यांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आता नवी कंपनी

५ वर्षात 3 लाख 70 हजार झोपड्यांचेच सर्वेक्षण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) (SRA) मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) हद्दीतील झोपडपट्ट्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण गेल्या पाच वर्षांपासून सुरु केले आहे. आजवर 3 लाख 70 हजार झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अजूनही हजारो झोपड्यांचे सर्वेक्षण रखडलेले आहे. आधीच्या कंपनीकडून सर्वेक्षण वेळेवर पूर्ण होत नसल्याने एसआरएने कंपनी बदलली असून आता नवीन कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरु केले आहे.

झोपडीपट्टी पुनर्विकास योजना (एसआरए) म्हटलं की बोगस झोपड्या, बोगस झोपडीधारक आलेच. प्रत्येक प्रकल्पात बोगस झोपड्या आणि बोगस झोपडीधारक असतातच. झोपडीचा पत्ता नसतो पण झोपडीधारकाचं नाव असतं. झोपडी असली तरी झोपडीधारक कुणी भलताच असतो. त्यामुळे एसआरए योजनातून बोगस झोपड्या आणि बोगस झोपडपट्टीधारकांना हद्दपार करण्यासाठी एसआरएने डोअर टू डोअर बायोमेट्रिक सर्वेक्षणाचा आधार घेतला असून मुंबईत हे सर्वेक्षण सध्या सुरु आहे. मात्र या सर्वेक्षणाचा वेग अतिशय धीम्या गतीचा असल्यामुळे बोगस झोपडीधारकांचा प्रश्न जैसे थे आहे.

मुंबईसह महाराष्ट्राला झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प तत्कालीन सरकारने 2015 मध्ये आखला होता. सरकारचा हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एसआरएने पुढाकार घेत झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणाद्वारे झोपड्यांचा जीआयएस डाटा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्या विभागात किती झोपड्या आहेत त्याची माहिती जमा होणार असून पात्र आणि अपात्र झोपड्या किती याची माहितीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यासाठी होणारा पात्र-अपात्रतेचा गोंधळ बंद करता येणार आहे.

याशिवाय झोपडपट्ट्यांची हद्द ठरविण्यासाठी एसआरए टोपोग्राफिकल सर्व्हे करणार आहे. त्यामुळे मुंबईतील झोपडपट्ट्यांची हद्द रेखांकित केली जाणार आहे. त्यामुळे इतर भूखंडावर होणारे अतिक्रमण टाळता येणार आहे. या कामासाठी एसआरएने एका खाजगी कंपनीची नेमणूक केली होती. या कंपनीस सर्वेक्षण करण्यास वांद्रे, मानखुर्द, आदी विभागात विरोध झाला. त्यामुळे सर्वेक्षणाच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. वेळात सर्वेक्षण पूर्ण होत नसल्याने एसआरएने कंपनी बदलली असून आता या नवीन कंपनीमार्फत सर्वेक्षण सुरु केले आहे. आतापर्यंत 3 लाख 70 हजार झोपडीधारकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यास कंपनीस आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण काय करते?
एकट्या मुंबईत सध्या सुमारे ४८ टक्के रहिवासी हे झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्याला आहेत. मुंबईच्या लोकसंख्यावाढीला शहरातील विविध क्षेत्रे, रस्ते, समुद्राकाठच्या व महत्त्वाच्या संवेदनाशील जागांवर अनधिकृतपणे वसलेल्या झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण कारणीभूत आहे. परिणामी, शहर विद्रूप वा रोगट होण्याच्या बाबतीत झोपडपट्ट्यांचा मोठा वाटा आहे. अशा या झोपड्या मुंबईत ३० वर्षांहून जास्त काळ चिकटून आहेत व शहराचे सर्वांगीण आरोग्य बिघडण्यात त्यांचा वाटा आहे. या झोपडपट्ट्यांचा वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. या झोपडपट्टीवासीयांना आता १५ वर्षांहून अधिक काळ शहरात वास्तव्यास झाल्यामुळे, ते या शहराचे नागरिक बनले आहेत व त्यांना सहजासहजी शहरातून हाकलून देणेही शक्य नाही. परंतु, सरकारकडून या झोपडपट्ट्यांचे पक्क्या घरांत स्थलांतर करणे जरुरी आहे. तसेच त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व त्यांना योग्य त्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी, सरकारचे प्रयत्न हवे. त्या दृष्टीने सरकारतर्फे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण काम करत आहे.

बायोमेट्रिक सर्वेक्षण कसे होते?
बायोमेट्रिक सर्वेक्षणांतर्गत अंगठ्याचा ठसा, झोपडीधारक कुटुंबातील मुख्य व्यक्तीचा फोटो, झोपडीचा आतल्या भागातला व्हिडिओ तसेच झोपडीच्या बाहेरच्या भागातील फोटो अशाप्रकारचे पुरावे हे टॅबलेटच्या माध्यमातून अपलोड केले जातात. रिअल टाईम पद्धतीने हे झोपडीधारकाचे सर्वेक्षण होते. तसेच झोपडीधारकाचा आधार कार्ड क्रमांक हा त्या झोपडीच्या तपशिलासोबत लिंक केला जातो.