BMC
BMC Tendernama
मुंबई

BMC : मुंबईच्या सौंदर्यीकरणावर होऊ दे खर्च; आतापर्यंत 617 कोटींचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde0 यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने मुंबईत सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले असून, यासाठी तब्बल १,७२९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत ६१७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तर याअंतर्गत वांद्रे पश्चिमेकडील उत्तुंग इमारतींचे सुशोभीकरण करण्यासाठी पर्जन्य वाहिन्या, झोपडपट्टीत गटारे दुरुस्तीचा अनुभव असलेल्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे. यासाठी मुंबई महापालिका ८२ लाख ६९ हजार रुपये खर्चणार आहे.

मुंबईचे सौंदर्यीकरण प्रकल्पात आता उंच इमारती थ्रीडी भित्तिचित्रांनी सुशोभीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी महापालिकेने ७० लाख ६५ हजार रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त केला होता. कामासाठी मागवलेल्या टेंडरमध्ये दोन कंत्राटदार पात्र ठरले. एम. के. इन्फ्राटेक्ट या कंत्राटदाराने दोन टक्के अधिक दरासह ७२ लाख ७ हजाराची तर शीतल इन्फ्राप्रोजेक्ट्स या कंत्राटदाराने ३ टक्के उणे दराने ६८ लाख ५४ हजारांची बोली लावली होती. यापैकी कमी खर्चाचे टेंडर भरलेल्या शीतल इन्फ्राप्रोजेक्ट्सला हे टेंडर देण्यात आले आहे. कुठलेही टेंडर देताना त्या कंत्राटदाराला संबंधित कामाचा अनुभव आहे का याची खात्री करून टेंडर देण्यात येते. मात्र, सुशोभीकरणाचा कोणताही अनुभव नसताना शीतल इन्फ्राप्रोजेक्ट्सला हे टेंडर देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले असून, यासाठी तब्बल १,७२९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पात नागरिकांसाठी मोकळ्या जागांची निर्मिती, वाहतूक बेटे, उद्याने, पदपथ, विजेचे खांब, उड्डाणपूल, सार्वजनिक भिंतींची सुधारणा, सुशोभीकरण यावर भर दिला आहे. ऑगस्टपर्यंत या सौंदर्यीकरण प्रकल्पात एकूण १,१९६ कामांचे कार्यादेश देण्यात आले आहेत. यापैकी ९५१ कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये शहर विभागातील २८९, तर उपनगरांमधील ६६२ कामांचा समावेश आहे. प्रकल्पावर आजपर्यंत ६१७ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.