Mumbai
Mumbai Tendernama
मुंबई

वांद्रे ते माहीम किल्ला सायकल ट्रॅक, बोर्ड वॉर्कवर २१८ कोटी खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईकरांना लवकरच शहरात मुक्तपणे सायकलिंग करता येणार आहे. मुंबई महापालिकेने वांद्रे किल्ला ते माहीम किल्ला दरम्यान ३.५९ किमी 'सायकल ट्रॅक' आणि 'बोर्ड वॉर्क'च्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यावर २१८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुढच्या दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

मुंबईत अनेक जुनी पर्यटनस्थळे आहेत. मात्र, नव्याने पर्यटनस्थळे बनवण्यात आलेली नाहीत. मुंबई हे एक बेट असल्याने शहराच्या तिन्ही बाजूला समुद्र किनारा लाभला आहे. म्हणूनच, समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेक्षणीय स्थळे उभारण्यात येणार आहेत. यासाठी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये मुंबई महापालिकेकडे प्रस्ताव ठेवला होता.

या प्रस्तावानुसार, वांद्रे आणि माहीम या दोन किल्ल्यांवर समुद्रकिनाऱ्यालगत सायकल ट्रॅक आणि बोर्ड वॉर्क बांधण्यात येणार आहे. त्यावेळी या प्रस्तावाला काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि भाजपाने विरोध केला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे हा प्रस्ताव रद्द होण्याच्या मार्गावर होता. परंतु, तब्बल १५ महिन्यांनंतर मुंबई महापालिकेने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पुढच्या दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचा अंदाज आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १० वर्षे देखभाल दुरुस्ती कंत्राटदाराने करायची आहे. मे.टंडन अर्बन सोल्यूशन्स प्रा.लि. हे या प्रकल्पाचे सल्लागार असून, त्यांना यासाठी ३६ लाख ६६ हजार ९४१ रुपये मोबदला दिला जाणार आहे.