BMC
BMC Tendernama
मुंबई

Mumbai : त्या 5.5 किमी उन्नत मार्गासाठी बीएमसीचे 662 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणारा 5.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केले आहे. पूर्व द्रुतगती मार्गाचे टोक ऑरेंज गेटपासून ते ग्रँट रोडपर्यंतच्या या मार्गामुळे ३० ते ५० मिनिटांचा प्रवास अवघ्या ५ ते ७ मिनिटांत होणार आहे. शिवाय दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या कामासाठी 662 कोटींचे टेंडर मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केले आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग, ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल या भागातील म्हणजेच दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत, अधिक सुलभ व अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कोस्टल रोडला पूर्व द्रुतगती मार्गाशी जोडण्यासाठीही हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

हा उन्नत मार्ग दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजीक सुरू होणाऱ्या पूर्व द्रूतगती मार्ग येथून ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत प्रस्तावित आहे. पूर्व द्रुतगती मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे 5.56 किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या 30 मिनिटे ते 50 मिनिटे एकढा कालावधी लागतो. भविष्यात हे अंतर कापण्यासाठी केवळ 6 ते 7 मिनिटे लागतील. टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्यापासून सुमारे 42 महिन्यांच्या कालाकधीत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.