Hancock Bridge
Hancock Bridge Tendernama
मुंबई

'त्या' झुलत्या पुलासाठी ९८ कोटींचे टेंडर; 550 मीटर अंतरात पूल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वांद्रे कुर्ला संकुल ते माहिम महाराष्ट्र निसर्ग उद्यान दरम्यान झुलता पूल उभारला जाणार आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील सिटी पार्क ते माहिम महाराष्ट्र निसर्ग उद्यान या 550 मीटर अंतरात हा पूल बांधला जाणार आहे. सप्टेंबर महिन्यात या पुलासाठी टेंडर प्रसिद्ध होईल. सुमारे 98 कोटींचे बजेट त्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.

सिटी पार्क ते निसर्ग उद्यानामधे दोन उंच मनोरे प्रस्तावित आहेत. हा पूल कोणत्याही आधाराशिवाय बांधला जाईल. हा पूल सर्वाधिक लांब पादचारी पूल ठरेल. या पुलामुळे संकुल ते सायन रेल्वे स्थानकापर्यंत पायी जाता येईल. या पुलामुळे धारावी जंक्शनला वळसा घालून सायन रेल्वे स्थानक किंवा निसर्ग उद्यानापर्यंतचा वळसा टळेल. या पुलावरून भविष्यात मेट्रो 2-ब या मार्गापर्यंत जाणेही सोपे होणार आहे. डिझाईनफॅक्ट इंटरनॅशनलचे दीप डे आणि मोनिका डे यांनी या पुलाचा आराखडा तयार केला आहे. ही कंपनी एमएमआरडीएसाठी आणखी तीन केबल आधारित पूल बांधत आहे. त्याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या चरखा पुलाचेही काम करत आहे. झुलता पूल हा लाकूड आणि काचेचा वापर करून उभारला जाणार आहे. हा पूल मिठी नदीवरून जाईल. काच असल्याने पुलाखालील दृश्यही पाहता येईल.

वांद्रे कुर्ला संकुल ते निसर्ग उद्यान या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर खारफुटी असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येत असतात. त्यामुळे पर्यटकांसाठी हा पूल विशेष आकर्षणाचे ठिकाण ठरू शकते. पुलाची उंची कमी करा, अशी सूचना विमानतळ प्राधिकरणाने एमएमआरडीएला केली होती. त्यानंतर पुलाची उंची 57 मीटरवर आणण्यात आली. अपेक्षित पादचार्‍यांची संख्याही गृहीत धरण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात या पुलासाठी टेंडर मागवण्यात येईल. या कामासाठी 98 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.