BMC
BMC Tendernama
मुंबई

मुंबई महापालिकेचे 'या' प्रमुख उड्डाणपुलासाठी ४१८ कोटींचे रिटेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईमध्ये गोरेगाव खाडी ओलांडून अंधेरी (पूर्व) ते गोरेगाव (पश्चिम) जोडण्यासाठी मुंबई महापालिकेने चार पदरी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी महापालिकेने 418 कोटींचे रिटेंडर प्रसिद्ध केले आहे. हा पूल 500 मीटर लांब आणि 33 मीटर रुंद आणि स्टेनलेस स्टीलच्या वापरातून साकारला जाणार आहे. तसेच या पुलावर केबल आधारित तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे.

गोरेगाव खाडीजवळ 36.6 मीटर लांबीचा रस्ता आहे. 1991 च्या विकास आराखड्यात खाडी क्षेत्र हा पूल बांधण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. या परिसरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आता महापालिकेने पूलाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. खाडी परिसरातील काही भूखंड खाजगी आहेत आणि 350 झोपडपट्ट्या देखील आहेत. अंधेरी (पूर्व) आणि गोरेगाव (पश्चिम) वॉर्ड कार्यालये या झोपडपट्ट्या कायदेशीर आहेत किंवा कसे याची पडताळणी करुन त्यानंतर त्या इतरत्र हलवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

या प्रकल्पासाठी दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले आहे. पहिल्या टेंडरमध्ये साधारण स्टीलचा वापर करून पूल बांधण्याचे ठरले होते. मात्र हा पूल खाडीवर बांधला जाणार असल्याने कालांतराने पूल गंजू नये म्हणून स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टेनलेस स्टीलचा वापर केल्याने पुलाच्या देखभालीचा खर्चही कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेमार्फत सल्लागाराची नियुक्ती केल्यानंतर, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून परवानग्या घेतल्या जातील. या मार्गावर काही विजेच्या ताराही आहेत आणि त्या काढण्याबाबत महापालिका संबंधित कंपनीशी चर्चा करणार आहे.