Nala Safai
Nala Safai Tendernama
मुंबई

BMC नालेसफाईसाठी जानेवारीतच इन ऍक्शन; १८० कोटींची टेंडर प्रसिद्ध

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वेळेत गाळ उपसला जात नसल्याने पावसाळ्यात मुंबईतील नद्या, नाले दरवर्षी तुंबतात. हे टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने नाल्यांसह नद्यांमधील गाळ वेळीच उपसण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे १८० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. महानगरपालिकेत सध्या नालेसफाईसाठी वेगवेगळ्या २३ टेंडरसाठीची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या अटीनुसार गाळ काढणे, साठवणे, वाहून नेणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या सर्व कामांची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार आहे. कंत्राटदाराने काढलेल्या गाळाच्या वजनानुसारच कामाचे पैसे दिले जाणार आहेत. गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र डंपिंग ग्राऊंड नसल्याने गाळ मुंबईच्या हद्दीबाहेर वाहून न्यावा लागणार आहे. मोठ्या नाल्यांतील गाळ काढण्यासाठी, तरंगता कचराही काढण्यासाठी मनुष्यबळासह सील्ट पुशिंग पन्टून मशीन, मल्टीपर्पज ऑफ्मिबीअस पन्टून मशीन यांचा वापर करता येणार आहे.

गेल्या वर्षी ही नालेसफाई 11 एप्रिल रोजी सुरू झाली होती. मात्र यावर्षी फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या सुरुवातीलाच नालेसफाईचे काम सुरू करण्यासाठी महापालिका काम करीत आहे. नालेसफाईच्या पहिल्या टप्प्यात पावसाळापूर्व 31 मेपर्यंत पहिला टप्पा संपणार आहे. या टप्प्यात एकूण गाळापैकी 80 टक्के गाळ काढला जाईल. दुसरा टप्पा पावसाळ्यातील कामाचा असून यामध्ये 10 टक्के नालेसफाई केली जाणार आहे. हा कालावधी 1 जून ते 30 सप्टेंबर असा राहणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात पावसाळ्यानंतर 10 टक्के काम केले जाणार आहे.

महापालिकेने सध्या नालेसफाईसाठी म्हणून २३ टेंडर प्रसिद्ध केली आहेत. मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी 1, पूर्व उपनगरासाठी 2 आणि पश्चिम उपनगरासाठी 3 टेंडर काढण्यात आली आहेत. तर छोट्या नाल्यांसाठी शहर विभागासाठी 2, पश्चिम उपनगरासाठी 6 आणि पूर्व उपनगरांसाठी 6 टेंडर काढण्यात आली आहेत. तसेच मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी ३ टेंडर मागवण्यात आली आहेत. या संपूर्ण कामासाठी एकूण 180 कोटी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.

कंत्राटदाराकडून नालेसफाई योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी पालिकेने सीसीटीव्ही लावले होते, यंदा देखील या कामांवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

एकूण छोटे नाले : 1508 (लांबी 605 किमी)
एकूण मोठे नाले : 309 (लांबी 290 किमी)
रस्त्याखालील ड्रेन : 3134 किमी