BMC
BMC Tendernama
मुंबई

Mumbai : वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गासाठी टेंडर; प्रकल्प खर्चात 6000 कोटींची वाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील वाहतूक कोंडी मात करण्यासाठी मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) आणखी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. वर्सोवा ते दहिसर हा तो सागरी किनारा मार्ग आहे. वेगवेगळ्या ६ टप्प्यात या प्रकल्पाचे काम प्रस्तावित असून त्यासाठी स्वतंत्रपणे टेंडर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. सुरुवातीला १० हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आता १६ हजार कोटींच्या घरात गेला आहे. २२ किलोमीटर लांबीच्या वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गामुळे प्रवास वेगवान होणार आहे.

कल्याण, भिवंडीसह मुंबईला मीरा-भाईंदर, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाणे यांना जोडण्यासाठी मुंबई महानगरपालिका अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. सध्या मरिन ड्राइव्ह ते वरळीदरम्यान सागरी किनारा मार्गाचे काम सुरू असून, ते ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे. येत्या नोव्हेंबरपासून एक टप्पा सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. हा सागरी किनारा मार्ग वांद्रे ते वरळी सी लिंकला जोडला जाणार आहे. याबरोबरच महापालिकेने दहिसर ते भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्पाच्या कामांसाठीही एल अँण्ड टी कंपनीची निवड केली आहे. साधारण पाच किलोमीटर लांबीच्या या मार्गाचे काम चार वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरून सिग्नलविरहीत १० मिनिटात प्रवास होणार आहे.

या सर्व मार्गांना नव्याने होणाऱ्या वर्सोवा-दहिसर सागरी किनारा मार्गाची जोड मिळणार आहे. वर्सोवा ते दहिसर हा तब्बल १६ हजार कोटींचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. या प्रकल्पाचे काम सहा पॅकेजमध्ये केले जात आहे. पॅकेज ए-वर्सोवा ते बांगूर नगर, पॅकेज बी-बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड आणि जीएमएलआर जोडरस्ता. पॅकेज सी-माईंड स्पेस मालाड ते चारकोप (उत्तरेकडील बोगदा), पॅकेज डी-चारकोप ते माईंडस्पेस मालाड (दक्षिणेकडील बोगदा), पॅकेज ई-चारकोप ते गोराई, पॅकेज एफ-गोराई ते दहिसर या सहा पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रत्येक पॅकेजची स्वतंत्र टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मॉन्सूनसह ४८ महिन्यांच्या कालावधीसाठी टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे.

या टप्प्यात होणार वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्ग-

पॅकेज ए- वर्सोवा ते बांगूर नगर ( ४.५ किमी)                             २,५९३ कोटी

पॅकेज बी- बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड (१.६६ किमी)            २९१० कोटी आणि गोरेगाव मुलूंड जोडरस्ता (४.४ किमी)

पॅकेज सी- माईंड स्पेस मालाड ते चारकोप (३.९ किमी) (उत्तरेकडील बोगदा) २९१० कोटी

पॅकेज डी- चारकोप ते माईंडस्पेस मालाड                                  २९११ कोटी (दक्षिणेकडील बोगदा) (३.९ किमी)      

पँकेज ई- चारकोप ते गोराई (३.८ किमी)                                   २९९० कोटी

पॅकेज एफ- गोराई ते दहिसर (३.७ किमी)                                    २६१२ कोटी