Nala safai
Nala safai Tendernama
मुंबई

BMC : भूमिगत गटारांतील गाळ काढण्यासाठी 107 कोटी; 2 कंपन्यांना कामे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील नाले सफाईच्या कामासोबत भूमिगत गटारांतील गाळ काढण्याच्या कामासाठी मुंबई महापालिकेने ४ टेंडर प्रसिद्ध केली आहेत. टेंडर प्रक्रियेअंती २ कंपन्यांना ४ विभागांची कामे सोपविण्यात आली आहेत. या कामांवर आगामी ४ वर्षांसाठी सुमारे १०७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

याअंतर्गत कुलाबा ते दादर विभागातील एकूण ९८ किलोमीटर पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे साफ करण्यात येणार आहे. या नालेसफाईवर चार वर्षांसाठी १०७ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी चार भागांसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. या टेंडर प्रक्रियेत ३ कंपन्यांनी सहभाग घेतला होता. टेंडरमध्ये या कामाचा सर्वाधिक अनुभव असलेली 'मिशिगन' ही कंपनी तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरली आहे. समान कामाच्या अनुभवाची पात्रता वाहनांच्या मालकीचे निकष पूर्ण न केल्याने कंपनीचे टेंडर प्रक्रियेत बाद ठरवण्यात आले आहे. तर उर्वरित दोन कंपन्यांपैकी एका कंपनीला तीन विभागांचे तर दुसऱ्या कंपनीला एका विभागाचे काम सोपवण्यात आले आहे. येत्या ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. नियोजित वेळेत शंभर टक्के कामे पूर्ण करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्धिष्ट आहे.

या ठेकेदारांना मिळाले टेंडर -
- विभाग : कुलाबा आणि भायखळा
- नियुक्त कंत्राटदार - एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर
- चार वर्षांसाठी होणारा खर्च: २०.४८ कोटी रुपये

- विभाग : काळबादेवी व नाना चौक
- नियुक्त कंत्राटदार: एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर
- चार वर्षांसाठी होणारा खर्च: २९.३७ कोटी रुपये

- विभाग : भायखळा
- नियुक्त कंत्राटदार: एकॉर्ड वॉटरटेक इन्फ्रास्ट्रक्चर
- चार वर्षांसाठी होणारा खर्च:२१.४३ कोटी रुपये

- विभाग : ना. म. जोशी मार्ग व दादर
- नियुक्त कंत्राटदार :आर्यन पंप्स अँड इन्व्हारनो
- चार वर्षांसाठी होणारा खर्च: ३६.३१ कोटी रुपये